दुर्दैवी! आई मिसळ घेऊन परतली अन् दिसला मुलाचा मृतदेह, रजेवर आलेल्या जवानाची आत्महत्या

जळगाव : सुट्टीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यातील ममुराबाद येथे मंगळवारी सकाळी ८:३० वाजता घडली. दीपक अशोक निकम (वय ३८) असे आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. या घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दीपक निकम काही दिवसांपूर्वी सुट्टीवर घरी आला होता. मंगळवारी सकाळी त्याने आपल्या आईला मिसळ आणून देण्याची विनंती केली. आई मिसळ घेण्यासाठी बाहेर गेल्यानंतर तो घरी एकटाच होता. या संधीचा फायदा घेत त्याने घरातील मधल्या खोलीत जाऊन गळफास घेतला.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

काही वेळाने आई मिसळ घेऊन घरी परतली. दरवाजा बाहेरून बंद दिसत असल्याने तिने आतून आवाज दिला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी तिने दरवाजा उघडताच तिच्या डोळ्यासमोर मुलाचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला.

ही हृदयविदारक दृश्य पाहून आई हंबरडा फोडत बाहेर धावली. तिचा आक्रोश ऐकून शेजारी आणि नातेवाईकांनी धाव घेतली व त्यांनी तातडीने दीपकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात  दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

रुग्णालय परिसरात दीपकच्या नातेवाईकांनी, मित्रपरिवाराने आणि सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूने कुटुंबीयांमध्ये आक्रोश आणि शोकाकुल वातावरण निर्माण झाले.

दीपक निकम यांच्या आत्महत्येचे खरे कारण अद्याप समजू शकले नाही. कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडलेली नाही. तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद  करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.