धक्कादायक : गुरुकुलमधील स्वामी ऋषीस्वरूपदासांनी गळफास घेत संपवली जीवन यात्रा

भुसावळ : साकेगावातील श्री स्वामिनारायण गुरूकुलचे सचिव तथा स्वामी ऋषीस्वरूपदास महाराज (२८) यांनी गुरूकुलमधील त्यांच्या राहत्या खोलीत छताला दोर बांधून गळफास घेतला. ही घटना शनिवारी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. महाराजांनी केलेल्या आत्महत्ये मागचे कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. मृत्यूपूर्वी महाराजांनी पेन्सीलने लिहिलेली चिठ्ठी आढळली असून त्यात ‘मोबाइल कनेक्ट टू वायफाय’ असा उल्लेख आहे. मोबाइल लॉक असल्याने त्याचे लॉक फॉरेन्सिक लॅबमध्ये उघडले जाईल व कॉल रेकॉर्डवरून तपासाची दिशा ठरणार आहे.

गुरुकुलमध्येच वास्तव्य
जळगाव रोडवरील श्री स्वामी नारायण गुरूकुल येथे राहात असलेले स्वामी ऋषीस्वरूपदास हे शनिवारी गुजराथमधील वडताल येथे मोठ्या स्वामीसोबत जाणार होते. स्वामी ऋषीस्वरूपदास यांनी शुक्रवारी रात्री २ वाजेपर्यंत शाळेच्या आवारात गस्त केली. सर्वत्र लक्ष ठेवले. शनिवारी सकाळी गुजराथमध्ये जाण्यासाठी गाड्या तयार झाल्यात. जळगाव येथे सुरू असलेल्या स्वामिनारायण महोत्सवासाठी आलेले स्वामी के. के. शास्त्री महाराज व अन्य महाराज येथे

आले होते, ते गुजराथमध्ये जात होते, त्याच्या सोबत स्वामी ऋषीस्वरूपदास महाराजसुध्दा जाणार होते. त्यामुळे त्यांना सकाळी आवाज दिला, मात्र त्यांनी काहीही प्रतिसाद दिला नाही, दोन ते तीन वेळा आवाज दिल्यावर काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने थेट वरती जाऊन पहाणी केली. या वेळी दरवाजा ठोकला मात्र, काहीही प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे त्या खोलीची खिडकी उघडली असता, आत स्वामी ऋषीस्वरूपदास यांनी गळफास घेतल्याचे दिसल्याने एकच धावपळ उडाली.

तालुका पोलिसात नोंद : चिठ्ठी जप्त
तालुका पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी धाव घेतली. खिडकीचा गज कापून रूममध्ये प्रवेश केल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडण्यात आला व पोलिसांनी मृतदेह खाली उतरवून ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी हलवला. स्वामी ऋषीस्वरूपदास हे मूळचे भुसावळातील असून त्यांचे वडील उमेश कडू भारंबे हे आता मुंबईत निवृत्तीनंतर राहतात. त्यांच्या पश्चात वडील, आई, भाऊ, एक बहीण असा परिवार आहे. दरम्यान, स्वामींनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी, मोबाइल, तेथील दोरी आदी साहित्य तपासकामी जप्त केले. सहा. निरीक्षक नंदकिशोर काळे, उपनिरीक्षक मंगेश दराडे, हवालदार वाल्मीक सोनवणे, संजय भोई, जगदीश भोई यांनी पंचनामा केला.