---Advertisement---
अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवं पर्व सुरू होणार आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदावर वर्णी लागल्याने राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. मात्र या शपथविधीभोवती अनेक राजकीय प्रश्नचिन्हं निर्माण झाली आहेत. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना कोणतीही पूर्वकल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे शरद पवार हे या संपूर्ण प्रक्रियेत अलिप्त राहिल्याचं स्पष्ट होत आहे.
एकनाथ खडसे काय म्हणाले ?
“राजकारणात निर्णय घेताना केवळ सत्तेचं गणित पाहून चालत नाही, तर पक्षातील ज्येष्ठ नेते आणि प्रमुख चेहऱ्यांना विश्वासात घेणं तितकंच गरजेचं असतं.” शपथविधीबाबत शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना पूर्वकल्पना नव्हती, ही बाब दुर्दैवी असल्याचंही त्यांनी अप्रत्यक्षपणे सूचित केलं.
अजित पवार गटाची राष्ट्रवादी सध्या सत्तेत असल्यामुळे निर्णय घेण्याचे अधिकार हे सत्ताधारी आघाडी आणि त्या पक्षाकडे असू शकतात, हे मान्य करत असतानाच, “पण अशा निर्णयांचा परिणाम पक्षाच्या भविष्यातील एकतेवर होऊ शकतो,” असा इशारा खडसेंनी दिला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवरही खडसेंनी भाष्य केलं. या संदर्भात आधी जयंत पाटील यांच्याकडे अनेक बैठका झाल्या होत्या आणि नंतर शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती, यावरून एकत्र येण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती, असं त्यांनी नमूद केलं.
“घोषणा फक्त 12 फेब्रुवारीला करायची होती, असं समजत होतं. मात्र आज झालेल्या शपथविधीमुळे त्या प्रक्रियेला अचानक वेगळं वळण लागलं आहे,” असं खडसे म्हणाले.
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विश्वासात घेऊन निर्णय झाला असता, तर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमधील दरी कमी झाली असती, असं मत व्यक्त करत, आता दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा कधी आणि कशा प्रकारे एकत्र येतील, हे सांगणं कठीण असल्याचं खडसेंनी स्पष्ट केलं.
सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा काय असेल, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे.









