Supreme Court Decision : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टात पक्षाच्या ‘घड्याळ’ चिन्हांबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेसंदर्भांत कोर्ट काय निकाल देणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळलेल्या तुतारी चिन्हांबाबत मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मताधिक्य कमी झाल्याचा दावा करण्यात आला होता. परिणामी अजित पवार यांच्या पक्षाला याचा लाभ मिळाल्याचे बोलले जात होते.
शरद पवार यांनी दाखल केलेल्या याचिकेत अजित पवार गटाला आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘घड्याळ’ चिन्हाचा वापर करण्यापासून रोखण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली होती. आज सर्वोच्च न्यायालयाने शरद पवार यांची ही याचिका फेटाळून लावत अजित पवार यांना एक चांगला दिलासा दिला असल्याचे यातून दिसून येत आहे.
सर्वोच्च न्यायालयाने पक्ष चिन्हांबाबत दिलेल्या निर्णयाने अजित पवार यांचा मार्ग सुकर झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसल्याचे दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अजित पवार यांच्याकडे घड्याळ चिन्ह कायम असणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला घड्याळ चिन्हा ऐवजी दुसरे चिन्ह देण्यात यावे अशी मागणी शरद पवार यांच्यातर्फे करण्यात आली होती.
शरद पवार यांच्या याचिकेवर अजित पवार यांच्या वकिलांनी जोरदार प्रतिवाद केला. त्यांनी घड्याळ ऐवजी दुसरे चिन्ह देण्याच्या मागणीही खंडन करत यामागणीला विरोध केला आहे. आपली बाजू मांडतांना अजित पवार यांच्या वकिलांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. आमच्या काही उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर अर्ज दाखल केले आहेत, असे त्यांनी म्हटले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या पक्षाचे घड्याळ चिन्ह कायम राहणार असल्याचे आदेश दिले. या निर्णयाचा अजित पवार यांना मोठा फायदा मिळणार आहे. त्यांना नवीन चिन्ह मिळाले असते तर हे चिन्ह कमी वेळात मतदारांपर्यंत पोहचविणे त्यांना अवघड झाले असते.