चाळीसगाव : शहरातील रस्ते,शासकीय कार्यालय व वीज या पायाभूत सुविधांचा प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्याचे काम प्रगतीपथावर सध्या सुरू आहे. मात्र त्यासह नागरिकांना मनोरंजन, विरंगुळा, आरोग्य सेवांसह खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुवर्णताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जलतरण तलाव सुशोभीकरण प्रकल्प आमदार मंगेश चव्हाण यांनी हाती घेतले आहेत. यामुळे शहराची वाटचाल विकासाच्या दूरदृष्टीतून आरोग्य हिताकडे चालली असून यामुळे शहराच्या सौंदर्यात देखील भर पडणार आहे.
आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या शुभहस्ते सुवर्णाताई स्मृती उद्यान व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरणाचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी चाळीसगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
शहरातील भडगाव रोड वरील नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सुवर्णा ताई स्मृती उद्यानाचा दि ४ ऑक्टोंबर रोजी रात्री ८ वाजता सुशोभिकरण भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या उद्यानासाठी १० कोटींचा भरघोस निधी पहिल्या टप्प्यात आमदार मंगेश चव्हाण यांनी उपलब्ध करून दिला आहे. त्याच सोबत नगरपालिका अंतर्गत येणाऱ्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव साठी ४ कोटी ५० लाखांचा निधी असे दोन्ही कामांसाठी आमदार चव्हाण यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर झाला असून यावेळी तलावाचे देखील भूमिपूजन करण्यात आले. अनेक वर्षांपासून सुवर्णाताई स्मृती उद्यान व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव हे दुरावस्थेत होते. जॉगिंग ग्रुप आणि स्विमिंग असोसिएशन ने नेहमीच याबाबतीत आपली नाराजी व्यक्त केली होती. आता आमदार चव्हाण यांनी घेतलेल्या निर्णयामुळे लवकरच उद्यान व जलतरण तलावाचे रूप बदलणार असल्याचे समाधान शहरवासीयांनी व्यक्त केले आहे. तसेच शिवबाबा ग्रुप व जॉगिंग ग्रुप ने आमदार चव्हाण यांचा यावेळी सत्कार देखील केला.
यावेळी भूमिपूजन प्रसंगी बोलतांना आमदार चव्हाण यांनी सांगितले की मी रक्ताचा वारसदार नसलो तरी चांगल्या कामाचा वारसदार आहे. विचारांचा वारसदार आहे. सुवर्णा ताई स्मृती उद्यानाला शोभेसे असे उद्यान तयार करणार असून जे अनेक सुख सुविधा युक्त असे असणार आहे. हे उद्यान शिरपूर च्या उद्यानाच्या बरोबरीचे असणार आहे. त्याच प्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव पुनर्जीवित करणार आहे, हे काम टाटा सारख्या नामांकित ब्रँड चे फिल्टरेशन करण्याचे काम करणाऱ्या कंपनीला पुढील विचार करून देण्यात आले आहे. दोन्ही कामांचे लोकार्पण १० ते १२ महिन्यात करणार. हे काम वास्तविक शहर नगरपलिकेने करायला हवे होते मात्र ४०० ते ५०० गाळे असणाऱ्या नगरपालिका प्रशासनाला ज्यांच्या कडे सत्ता होती त्यांनी कमर्शियल असेट व रेवेन्यू जनरेटचा फॉर्म्युला टिकू दिला नाही. शहराची परिस्थिती पहाता मला अनेक प्रश्न पडतात त्यांचे उत्तर देखील मीच देत असतो की बदल मलाच करावे लागेल. कारण ३५ ते ४० वर्ष एकच घराण्यात एकहाती नगरपालिकेची सत्ता होती. त्यांना लोकांनी नाकारले। २०१६ ला नवीन नेतृत्वावर विश्वास ठेवत सत्ता दिली. त्यांनी आपल्या प्रचारात खूप मोठी मोठी दिव्य स्वप्न दाखवली, शंभरच्या स्टॅम्पवर लिहून देतो 3 वर्षात जर बदल केला नाही तर राजीनामा देऊ, मात्र केले काहीच नाही. त्यांनी फक्त स्वप्न दाखवली कृती केलीच नाही. यामुळे आता मी एक छोटे जरी काम केलं तर लोक कौतुक करतात. कारण पूर्वीच्या लोकांनी हवी तशी कामे केली नाही. तुलनात्मक दाखविण्यासाठी शहरात काम झालेले नसल्याने मी केलेल्या प्रत्येक काम शहरात बदल घडवत असल्याची जाणीव करून देते. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण करायचे नाही आणि तुम्हाला स्वप्न ही दाखवायची नाही पण मी केलेली काम बघून तुम्ही स्वप्न बघत असल्याची जाणीव तुम्हाला नक्की होईल यात शंका नाही. राजकारण हा माझा व्यवसाय नसून मला राजकारणात पैसा कमवायचा नाही तर शहराचा विकास घडवायचा आहे आणि मी ते घडवणारच आहे असे यावेळी आमदार चव्हाण यांनी सांगितले.