धुळे : जिल्ह्यात राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग व राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्या अंतर्गत विविध आरोग्य योजना राबविण्यात येत आहेत. यात प्रधानमंत्री आयुष्यमान भारत जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना यांचा समावेश करण्यात आला आहे. या आरोग्य संरक्षण योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत पिवळे, केशरी, अंत्योदय आणि पांढरे रेशन कार्डधारकांना देखील आरोग्य संरक्षण मिळणार आहे. 28 जुलै 2023 च्या शासन निर्णयानुसार, प्रत्येक कुटुंबाला प्रति वर्ष 1.5 लाख रुपये आरोग्य संरक्षण मिळण्याचे प्रमाण वाढवून 5 लाख रुपये करण्यात आले आहे. यामध्ये 1 हजार 356 आजारांवर उपचार केले जात आहेत. त्यापैकी 119 आजारांवर उपचार केवळ शासकीय रुग्णालयांत राखीव ठेवले आहेत.
धुळे जिल्ह्यात या योजनेत शासकीय व खासगी एकूण 42 रुग्णालये जोडली गेली आहेत, या रूग्णलयांमधून लाभार्थ्यांना पूर्णपणे मोफत उपचार मिळतात. या रुग्णालयांमध्ये जनआरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे, ज्यांच्याकडून योजनेसंबंधी माहिती आणि मदतीसाठी नागरिक संपर्क साधू शकतात.
तसेच, योजनेचा लाभ घेणाऱ्यांना कोणत्याही अडचणी असल्यास किंवा मदतीसाठी टोल फ्री क्रमांक 155388/18002332200 वर 24 तास संपर्क सेवा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी पापळकर यांच्या आवाहनानुसार, धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त योजनेचा लाभ घ्यावा.