भीषण अपघात! एसटीने दुचाकीस्वारांना चिरडत घेतला पेट, ६ ठार

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ८ डिसेंबर २०२२ । नाशिक-सिन्नर महामार्गावर आज गुरुवारी दुपारी भीषण अपघात घडला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडले असून सहा जणांचा मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. अपघातानंतर लगेचच बसने पेट घेतला.

या महामार्गावर शिंदे पळसे गावाजवळ हा अपघात झाला. दरम्यान, ब्रेक फेल झाल्याने बस एक चार चाकी आणि तीन ते चार दुचाकी वाहनांमध्ये अपघात घडला आहे. या अपघातातील बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न चालू असल्याची माहिती मिळाली आहे.

या अपघातानंतर बसने पेट घेतल्याने प्रवाशांनी धावत्या बसमधून उडी मारली. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

सध्या इथे बचावकार्य सुरू आहे. या अपघातात १० ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.