---Advertisement---
मनोज माळी
तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील आमलीबारीजवळील देवगोई घाटातील चढावावर रविवारी (9 नोव्हेंबर) सकाळी दहाच्या सुमारास शालेय बस तब्बल 100 ते 150 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर 56 विद्यार्थी जखमी झाल्याचे समोर आले आहे. घटनेनंतर स्थानिकांकडून मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. प्रशासन आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमींना तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे, तर इतर जखमी विद्यार्थ्यांवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयातच उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि मोलगींला जोडणाऱ्या देवगोई घाटात चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील मेहुणबारे येथील अनुदानित आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी शालेय बस तीव्र वळणावरून घसरत थेट नदीकिनारी दरीत कोसळून भीषण अपघात झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आरडाओरड सुरू केली. दिवाळीच्या सुट्यांमध्ये गावाकडे आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना आश्रमशाळेत नेण्यासाठी ही बस रविवारी (9 नोव्हेंबर) अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी परिसरात आली होती. विद्यार्थ्यांना बसमध्ये घेऊन ती अक्कलकुव्याकडे जात असतानाच, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट 100 ते 150 फूट दरीत कोसळली. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर स्थानिकांनी दरीत जाऊन मदतकार्य करत विद्यार्थ्यांना बाहेर काढले. यानंतर जखमी विद्यार्थ्यांना अक्कलुकवा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन ते तीन विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. दरीत कोसळलेली बस चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील मेहुणबारे गावातील अनुदानित आश्रमशाळेची असल्याची माहिती समोर आली आहे. अनुदानित आश्रमशाळेने रविवारी (9 नोव्हेंबर) दोन बस विद्यार्थ्यांना आणण्यासाठी पाठवल्याची चर्चा आहे. यातील एका बसचा अपघात झाला आहे. अपघात झालेल्या बसमध्ये मुली आणि बालकांचा समावेश असल्याचे समजले आहे. अपघातानंतर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने अपघातस्थळी धाव घेतली असून, मदतकार्य सुरू आहे.
अपघात इतका भीषण होता की, बस थेट खडकांवर आदळल्याने तिचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघाताचे कारण शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
अपघातील मृतांची नावे
जगदीश बहादूरसिंग तडवी (इयत्ता 2 री, रा. निबीपाडा), कपिला जाहागीर राऊत (इयत्ता 7 वी, काठी).









