Assembly Election: शिवसेना उबाठा तर्फे चाचपणी ; इच्छुकांची भाऊ गर्दी

जळगाव : शिवसेना उबाठा गटाकडून रविवारी दिवसभर भावी उमेदवारांची परीक्षा घेतली गेली. मात्र , काही मतदारसंघात उबाठा गटाकडून तयारी सुरू असताना तो मतदारसंघ मित्र पक्षांना जात असल्याने ‘शांत बसा’ अशा सूचना मिळताच गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्यांचा हिरमोड झाला.

शिवसेना उबाठा गटाकडून रविवारी दिवसभर उमेदवारांची चाचपणी झाली. जिल्ह्यात जे मतदारसंघ वाट्याला येणार आहेत त्या मतदारसंघातील इच्छुकांची येथे तोंडी परीक्षा झाली. पक्षाचे नेते खासदार संजय राऊत हे दिवसभर शहरात ठाण मांडून होते. शहरातील अजिंठा विश्रामगृहात यामुळे बरीच गर्दी झात्याचे दृश्य पहायला मिळाले. लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्यातून मोठा फटका बसल्याने विधानसभेसाठी प्रत्येकाचे ‘प्रगती पुस्तक’ पाहून निर्णय घेतले जाणार, अशी सूचना अगोदरच मिळाल्याने काहींचे चेहेरे या ठिकाणी पडले होते.

 

पक्षाचे नेते संजय सावंत हे वेळोवेळी संजय राऊत यांच्या कानात माहिती सांगत होते. साधारणतः मतदारसंघाच्या नावाचा उल्लेख झाल्यानंतर त्या मतदारसंघातील इच्छुक आत्यानंतर हे दृश्य पहायला मिळत होते. सकाळी ११ वाजेपासून ही परीक्षा सुरू झाली. जिल्ह्यातील नेते गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, महानगरप्रमुख शरद तायडे, माजी खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांच्यासह अन्य इच्छुकांची या ठिकाणी गर्दी होती.

शहरातील इच्छुकांची नाराजी जळगाव शहर मतदारसंघातून माजी महापौर जयश्री महाजन व माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रचंड बॅनरबाजी या दोघांकडून शहरात सुरू आहे, मात्र ‘हा मतदारसंघ आपला नाही, शांत बसा’ अशा सूचना मिळाल्यानंतर या इच्छुकांचे चेहरे पडले, तर मग ही मंडळी पक्ष बदलवितात का? अशी दबकी चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळत होती. काहीही झाले तरी निवडणूक लढविणारच, असे कुलभूषण पाटील यांनी जाहीर केले आहे, त्यामुळे ते काय करतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.

चाळीसगावकडे लक्ष
चाळीसगामध्ये उन्मेष पाटील हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. मात्र हा मतदारसंघ पवारांकडे असल्याचे सांगण्यात येत असल्यामुळे तेदेखील याठिकाणी शांत-शांत होते. पाचोऱ्यात वैशाली सूर्यवंशी यांची उमेदवारी ‘फायनल’ मानली जात आहे. त्यामुळे त्यांच्या गोटात आनंद दिसत होता.

जळगाव ग्रामीण’ मध्येही निराशा
‘जळगाव ग्रामीण’मधून गुलाबराव वाघ इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादीकडून या मतदारसंघातून माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर हे इच्छुक आहेत त्यामुळे या मतदारसंघातही मारामारीच दिसून येते आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडेच असावा, असा आग्रह काही इच्छुकांचा या ठिकाणी दिसून आला. या मतदारसंघातून लक्ष्मण पाटील (लकी टेलर), सुरेश चौधरी (धरणगाव) हेदेखील इच्छुक आहेत. यासह चोपडा विधानसभा मतदारसंघातूनही काही इच्छुकांनी मुलाखती दिल्या. ज्या मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) उमेदवार असतील तेथे उमेदवार देण्याचा पक्षाचा निर्णय असत्याचे बोलले जाते.

दिवसभर खलबते
उमेदवारीबाबत दिवसभर खलबलते सुरू होती, मात्र ज्या मतदारसंघातून तयारीत आहे, तेच मिळत नसल्याने काही जणांची नाराजी या ठिकाणी दिसून आली मात्र शांत बसण्याच्या सूचना मिळाल्याने अनेकांचा हिरमोडे झाल्याचे दृश्य या ठिकाणी पहायला मिळाले.