जळगाव : गेल्या काही दिवसात उत्तरेकडील शीत लहरींचा वाढलेल्या प्रभावामुळे राज्यात चांगलाच गारठा वाढलाय. उत्तरेकडील राज्यांमध्ये तापमान शुन्याखाली गेलंय. राज्यात पुढील तीन दिवस थंडीच्या लाटेचा इशारा हवामान विभागानं दिलाय.
राज्यभरात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा अधिक कडाका जाणवत असून, गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातील पारा ७ ते ८ अंशादरम्यान राहिला आहे.
आगामी एक ते दोन दिवस जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम राहील. मात्र, त्यानंतर काही दिवस थंडीचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यात जिल्ह्यात काहीअंशी थंडी पडली. तर काही दिवस थंडी गायब राहिली. डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘फेंगल’ या चक्रीवादळामुळे राज्यभरातून थंडी गायब झाली होती. फेंगल वादळाचा जोर कमी झाल्यानंतर मात्र जिल्ह्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. त्यात गेला आठवडा हा या हंगामातील सर्वांत थंड आठवडा ठरला.
दोन दिवसांनी थंडीचा जोर मंदावणार
गेल्या आठवडाभरापासून थंडीचा जोर वाढला असला तरी आगामी दोन दिवसांनंतर विशेष करून २० डिसेंबरनंतर जिल्ह्यात थंडीचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
रब्बी हंगामाला फायदा
कडाक्याच्या थंडीमुळे रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याला फायदा होत आहे. रात्रीच्या वेळेस ओस पडत असल्याने कोरडवाहू शेतीवरील पिकांना फायदा होत आहे. गहू व हरभऱ्याच्या वाढीस फायदा होत आहे.