---Advertisement---
जळगाव : नगरपालिका निवडणुकांच्या निकालांनंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलू लागली आहेत. विरोधकांचा वाढता आत्मविश्वास आणि संभाव्य धोके लक्षात घेत भाजप आणि शिंदेसेनेने महापालिका निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महापालिका निवडणूक राजकारणाला वेगळीच दिशा मिळाली असून महायुतीतील अंतर्गत समीकरणेही चर्चेत आली आहेत.
अर्थात भाजप आणि शिंदेसेनेने युतीची घोषणा केली आहे. दरम्यान, बैठकीत महापालिका निवडणूक युतीत लढण्यावर सकारात्मक चर्चा झाली. आमची महायुती निच्छित होईल. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाशी चर्चा करून जागावाटपाची घोषणा केली जाईल. भाजपचे पदाधिकारी राष्ट्रवादीशी चर्चा करतील. ही बैठक पूर्वनियोजित होती, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत
मात्र या बैठकीत राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचा थेट सहभाग नसल्याने महायुतीत सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी सांगितले की आमदार मंगेश चव्हाण यांच्याशी बोलणे झाले होते. मात्र या बैठकीचा आम्हाला कोणताही निरोप नव्हता. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी आमच्याशी चर्चा केली.
दरम्यान, आमदार तथा महापालिका निवडणूक प्रभारी चव्हाण यांनी स्पष्ट केले की, महापालिका निवडणुकीसाठी युती करण्याचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी (अजित पवार) गटाशी चर्चा अद्याप बाकी आहे. जागावाटप जवळपास निश्चित असून, राष्ट्रवादीशी चर्चा झाल्यानंतर दोन ते तीन दिवसांत तेही जाहीर केले जाईल.
नगरपालिका निकालांचा धक्का अन्…
नगरपालिका निकालांचा धक्का आणि बदललेले राजकीय वातावरण पाहता भाजप आणि शिंदेसेनेने घेतलेला सावध निर्णय, आता महापालिका निवडणुकीत किती परिणामकारक ठरतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.









