भाजप-शिवसेना युती फिस्कटली अन् राष्ट्रवादी-ठाकरे गटाची वज्रमूठ, नेमकं काय घडलं?

---Advertisement---

 

दीपक महाले
जळगाव :
महापालिका निवडणुकीचे महायुती व महाविकास आघाडीकडून रणशिंग फुंकले असून, राजकीय वातावरण आता ढवळून निघाले आहे. शहर महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना ठाकरे गटाची आघाडी जाहीर झाली आहे. ठाकरे गटासोबत मनसेही निवडणूक लढणार आहे. ठाकरे गटाच्या जागांमधून मनसेला जागांचा वाटा दिला जाणार आहे. यामुळे भाजप-शिवसेनेला थेट आव्हान देण्याची तयारी करण्यात आली आहे.

सध्या महापालिका निवडणुकीचा रणसंग्राम रंगला आहे. निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान, तर 16 जानेवारीला उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांचे नशीब उघडेल. दरम्यान ही निवडणूक जिंकण्यासाठी राज्यात युती आणि आघाड्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन ही युती केली जात आहे. जळगावात युतीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात चर्चा होत आहे. मात्र, जागावाटपावरून अद्याप दोन्ही पक्षांत एकमत झालेले नाही. शिंदे गटाने दिलेला जागांचा प्रस्ताव भाजपने मान्य केला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळेच रविवारी (28 डिसेंबर) झालेल्या बैठकीतून मंत्री गुलाबराव पाटील अवघ्या 15 मिनिटांनी बाहेर पडले. त्यामुळे आता जळगावात घडामोडींना वेग आला आहे.

शहरातील अजिंठा विश्रामगृहात भाजपचे संकटमोचक जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यात बैठक झाली. बैठकीत जागावाटपावर चर्चामंथन झाले. बैठकीदरम्यान युतीमध्ये शिवसेनेने भाजपला 26 जागांचा प्रस्ताव दिला. भाजपने हा प्रस्ताव मात्र धुडकावला. बैठक अवघ्या 15 मिनिटांत गुंडाळली. जागावाटपावर एकमत न झाल्याने मंत्री पाटील बैठकीतून थेट बाहेर पडले. दरम्यान, भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या जागावाटपांचा तिढा अद्याप कायम आहे. त्यामुळेच महापालिकेत शिवसेना शिंदे गट-भाजपची युती होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी युतीची घोषणा, पण राष्ट्रवादी नाराज

दोन दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार मंगेश चव्हाण आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप व शिवसेना शिंदे गट यांच्या युतीची अधिकृत घोषणा केली होती. मात्र, या प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अद्याप बाजूला असल्याचे चित्र आहे. आमदार अनिल पाटील यांनी यापूर्वीच समाधानकारक जागा न मिळाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा देत तयारी सुरू केली आहे. त्यामुळे महायुती होईल की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भाजप-शिवसेनेला थेट आव्हान; शिवसेना-ठाकरे गटाची एकजूट

दरम्यान, महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत महाविकास आघाडीने रणनीती आखली असून, जागावाटपाचा निर्णयही जाहीर केला. निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 38 जागांवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 37 जागांवर निवडणूक लढविणार आहे. माजी आमदार संतोष चौधरी यांनी रविवारी (28 डिसेंबर) पत्रकार परिषदेत या युतीची अधिकृत घोषणा केली. काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी करण्यात आली होती. मात्र, भाजप- शिवसेना महायुतीला थेट आव्हान देण्यासाठी अखेर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. माजी आमदार संतोष चौधरी यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेतृत्वाशी चर्चा करून महापालिकेसाठी ‌‘38-37‌’ असा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला असून, सर्वच्या सर्व 75 जागांसाठी ही आघाडी आता महापालिका निवडणुकीच्या आघाड्यात उतरण्याची तयारी केली आहे.

चौधरी यांनी स्पष्ट केले की, हे जागावाटप जरी दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये झाले असले, तरी महाविकास आघाडीतील इतर घटकपक्षांनाही सोबत घेतले जाणार आहे. ज्या जागा ज्या पक्षाला सुटल्या आहेत, त्यातून मित्रपक्षांना जागा सोडण्याचा निर्णय संबंधित पक्षप्रमुख घेतील. “आम्ही लहान पक्षांशीही चर्चा सुरू ठेवली असून, गरज भासल्यास जागांमध्ये फेरबदल करण्यात येईल,” असेही त्यांनी नमूद केले.

पत्रकार परिषदेला शिवसेनेचे संपर्कप्रमुख संजय सावंत, माजी खासदार उन्मेष पाटील, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार, एजाज मलिक, शिवसेना ठाकरे गटाचे महानगरप्रमुख शरद तायडे, संग्राम पाटील, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडीने जागावाटप आधीच जाहीर केल्यामुळे राजकीय आघाडी घेतल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे महायुतीत जागावाटपावरून अद्याप पेच कायम आहे. या नव्या राजकीय समीकरणांमुळे महापालिका निवडणूक आता अधिकच चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीची युती स्वार्थासाठी फिस्कटली!

दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय सावंत व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संतोष चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात महायुतीतील महापालिका निवडणुकीतील युती फिस्कटल्याच्या मुद्यावर टीकात्मक भाष्य केले. सावंत यांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजनांवर तोंडसुख घेतले. मंत्री महाजन हे काय करतात आणि काय सांगतात, हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. महापालिका निवडणुकीत महायुतीतील युती ही स्वार्थासाठी तुटली आहे, असे टीकास्त्र सावंत यांनी सोडत जळगावच्या विकासासाठी जे येतील, त्यांना सोबत घेण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीतील जागावाटपावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार संतोष चौधरी, शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील, करण पवार यांच्या बैठकीत चर्चा झाली. त्यात जागांबाबत एकमत झाले. त्यासाठी समविचारी पक्षांना सामावून घेण्याची जबाबदारी शरद पवार गटाकडे असून, मनसेला शिवसेना ठाकरे गटाच्या कोट्यातून, तर वंचितसह इतर समविचारी पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहेत. आता महापालिकेत बहुमत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही सावंत व चौधरी यांनी संवादात नमूद केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---