जळगाव । जळगावसह राज्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून, गेल्या काही दिवसांत तापमानात झालेली घट याचा थेट परिणाम जनजीवनावर दिसून येत आहे.
थंडीचा कडाका कायम राहिल्याने शेतकऱ्यांना त्यांच्या रब्बी हंगामातील पिकांसाठी हा काळ फायदेशीर ठरत आहे, परंतु जनावरांचे हाल आणि नागरिकांमध्ये थंडीची तीव्रता जाणवत आहे.
आगामी काही दिवसांमध्ये थंडीचा जोर काहीसा कमी होईल, याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या आठवड्याभराच्या कडाक्याच्या थंडीने लोकांना गारठवले असले तरी, हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० डिसेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील थंडी कमी होण्याची शक्यता आहे. काही प्रमाणात ढगाळ वातावरण निर्माण होईल आणि रात्रीचा पारा १२ ते १३ अंश सेल्सियसपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, कडाक्याच्या थंडीमुळे शेतकऱ्यांसाठी संमिश्र परिस्थिती निर्माण झाली आहे. रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याच्या उत्पादनासाठी ही थंडी लाभदायक ठरत आहे. रात्री ओस पडल्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो, ज्याचा कोरडवाहू पिकांवर सकारात्मक परिणाम होत आहे.
मात्र, दुसऱ्या बाजूला कडाक्याच्या थंडीमुळे जनावरांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे. त्यांना उष्णतेची पुरेशी व्यवस्था न केल्यास आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांसोबतच जनावरांचीही काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या परिस्थितीत शेतकरी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करतात, तर पिकांमध्ये अपेक्षित उत्पादन होण्याची शक्यता आहे.