---Advertisement---
पंढरपूर प्रतिनिधी: “माझी जिवींची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी… पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणीं वेधले…” या अभंग ओवीप्रमाणेच चैत्र एकादशी म्हणजेच कामदा एकादशी च्या निमित्ताने पंढरपूर नगरीत भक्तिभावाचे मंगलमय वातावरण निर्माण झाले असून भवि कांच्या गर्दीने पंढरीनगरी फुलून गेली आहे. २९ मार्च रोजी साजऱ्या होणाऱ्या या चैत्र यात्रेसाठी वारकरी दिंड्या, पालख्या आणि टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरीत दाखल होत असून विठ्ठल भेटीची आस प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली दिसते.
भविकांची संख्या रोडावली:
यंदा काही प्रमाणात भाविकांची संख्या पूर्वीपेक्षा कमी असल्याचे जाणवत असले, तरी भक्तीचा उत्साह अजिबात कमी झालेला नाही. बदलत्या हवामानाची परिस्थिती, वाढते तापमान तसेच इंधन व अन्य काही अडचणींचे हलके सावट यात्रेवर असले, तरी वारकऱ्यांचा विश्वास आणि श्रद्धा मात्र अढळ आहे. परिस्थितीशी जुळवून घेत भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीत दाखल होत आहेत, हेच या यात्रेचे खरे वैशिष्ट्य ठरत आहे.
प्रशासन सज्ज, विशेष नियोजन:
भाविकांच्या सोयीसाठी प्रशासन व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यंदा विशेष नियोजन केले आहे. दर्शन रांगेत पत्र्याचे शेड उभारून पिण्याचे पाणी, लिंबूपाणी, सरबत, पंखे व कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. उष्णतेचा त्रास कमी व्हावा यासाठी घेतलेल्या या उपाययोजना भाविकांसाठी दिलासा देणाऱ्या ठरत आहेत. तसेच आरोग्य सुविधा आणि केअर स्टॉल उभारून आरोग्याच्या दृष्टीनेही दक्षता घेतली जात आहे.
दर्शन व्यवस्थेत बदल..
दर्शन व्यवस्थेतही सकारात्मक बदल करण्यात आला असून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गर्दीचे योग्य नियोजन व्हावे यासाठी टोकन दर्शन, विशेष पूजा व व्हीआयपी दर्शनावर काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व भाविकांना समान संधी मिळून रांगेतून शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलाचे दर्शन घेता येत आहे. दरम्यान चंद्रभागा नदीपात्रातील पाण्याची पातळी कायम असून जे पाणी आहे ते थोड्याफार प्रमाणे दूषित असल्याचे भाविकांनी सांगितले, त्याचप्रमाणे काही ठिकाणी शेवाळ साचले देखील आहे. अशाच पाण्यात भाविकांना एकादशीचे पवित्र स्थान करावे लागणार असल्याने थोडीशी भाविकांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
सुरक्षा आणि पोलिस बंदोबस्त
सुरक्षा आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीने शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक नियंत्रण व गर्दी व्यवस्थापन प्रभावीपणे राबवले जात आहे.
अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेमुळे शहर अधिक मोकळे व सुसज्ज दिसत आहे. चंद्रभागा नदीपलीकडील ६५ एकर क्षेत्रात दिंड्यांच्या मुक्कामाची व्यवस्था असून, यंदा आरक्षण काहीसे कमी असले तरी प्रशासनाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सज्जता दाखवली आहे. दरम्यान, स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅसच्या उपलब्धतेबाबत काही ठिकाणी अडचणी जाणवत असल्या, तरी गॅस एजन्सींकडून पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भाविकांनाही यामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
विशेष आकर्षण कावड परंपरा…
यात्रेतील एक विशेष आकर्षण म्हणजे कावड परंपरा. मराठवाडा, विदर्भ आणि राज्याच्या विविध भागांतून भाविक कावड घेऊन पंढरपूरात येतात. श्री विठ्ठल मंदिरा च्या नामदेव पायरीवर जलाभिषेक करून “हर हर महादेव”च्या जयघोषात या कावडी पुढे शिखर शिंगणापूरकडे रवाना होतात. ही परंपरा भक्ती, श्रद्धा आणि सांस्कृतिक ऐक्य यांचे सुंदर प्रतीक ठरते.
श्री पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य..!
चैत्र कामदा एकादशीचे आणखी एक वेगळेपण म्हणजे भाविक उपवास करत असताना पांडुरंगाला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला जातो. चैत्र महिन्यातील श्री.शंकर-पार्वती चा विवाह निमित्त पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो अशी एक आख्यायिका सांगितली जाते. भक्तीतील हा भावनिक आणि पारंपरिक संगम यात्रेला अधिक वैशिष्ट्यपूर्ण बनवतो.
एकूणच, काही आव्हानांची जाणीव असतानाही पंढरपूरची चैत्र एकादशी यात्रा भक्ती, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जेने ओतप्रोत भरलेली आहे. विठ्ठलनामाच्या गजरात आणि वारकऱ्यांच्या एकसंध भावनेतून ही यात्रा पुन्हा एकदा “भक्तीचा सोहळा” ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.









