---Advertisement---
जळगाव : महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस असतानाही सत्ताधारी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे भाजप शेवटच्या क्षणी २०१८ प्रमाणे पुन्हा एकदा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार का? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सोमवारी दिवसभर भाजप-शिंदेसेना आणि भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात स्वतंत्र्य बैठकांच्या फेऱ्या सुरु होत्या. मात्र, या बैठकीतून ठोस तोडगा निघाल्याचे संकेत मिळाले नाहीत.
दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी युती निश्चित आहे, पण महायुतीबाबत संभ्रम आहे, असे व्यक्तव्य केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जर युती अथवा महायुती अंतिम झाली, तर अनेक निष्ठावंतांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी होण्याची शक्यता नेते गांभीर्याने घेत आहेत.
याच पार्श्वभूमीवर पक्षातील एक प्रभावी गट स्वबळावर लढा या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले जात आहे. अशात आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.
दुसरीकडे, महाविकास आघाडीने (शरद पवार व उद्धव ठाकरे) जागावाटपाचा फॉर्म्युला जवळपास निश्चित करून तयारीला वेग दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीतील गोधंळ अधिक ठळकपणे समोर येत आहे.
दरम्यान, आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने घडामोडी निर्णायक ठरणार आहेत. भाजप महायुतीतील मित्रपक्षांशी मैत्री निभावणार की पुन्हा एकदा ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणार, याकडे जळगावच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.








