---Advertisement---
बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी एक हृदयद्रावक घटना समोर आली असून डोंबिवलीत राहणाऱ्या एका विद्यार्थ्याचा लोकल रेल्वे अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. परीक्षा देण्यासाठी घरातून निघालेला विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकला नाही, ही बाब संपूर्ण परिसराला हादरवून टाकणारी आहे.
सोहम सचिन कटरे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो डोंबिवली येथे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. कळवा येथील मनिषा विद्यालयात त्याचे बारावीच्या परीक्षेचे केंद्र होते. मंगळवारी सकाळी पहिल्या पेपरसाठी तो नेहमीप्रमाणे लोकल ट्रेनने प्रवास करत होता.
सकाळच्या गर्दीच्या वेळेत लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवास करत असताना गर्दीमुळे सोहमचा तोल गेला आणि तो धावत्या लोकलमधून खाली कोसळला. हा अपघात इतका गंभीर होता की त्यात सोहमचा जागीच मृत्यू झाला.
डोंबिवली ते कळवा हे अंतर फारसे मोठे नसले तरी लोकलमधील प्रचंड गर्दी त्याच्या जीवावर बेतली. बारावीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या विद्यार्थ्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून अनेकांनी रेल्वे प्रवासी सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित केला आहे.
मुंबई लोकलमधील वाढती गर्दी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही मध्य रेल्वे मार्गावर अशा प्रकारच्या दुर्घटना घडलेल्या आहेत. धावत्या लोकलमधून पडून अनेकांनी आपला जीव गमावला आहे. प्रवाशांची संख्या वाढत असताना सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.









