Helicopter crash । पुण्यातील बावधन परिसरात आज सकाळी ७.३० वाजता एका हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघात झालेल्या या हेलिकॉप्टरने खासदार सुनील तटकरे प्रवास करणार होते, अशी माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण घेतल्यानतंर अवघ्या तीन मिनिटातच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. डोंगराळ भागातून जात असताना धुक्याचा अंदाज न आल्याने हे हेलिकॉप्टर कोसळले, असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान, अपघात झालेले हे हेलिकॉप्टर खासदार सुनील तटकरे यांना घेण्यासाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. सुनील तटकरे यांनी मंगळवारी ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीच्या याच हेलिकॉप्टरने प्रवास केला होता.
विशेष म्हणजे, सुनील तटकरे हे मंगळवारी या हेलिकॉप्टरने पुण्याहून परळीला गेले होते. त्यानंतर ते याच हेलिकॉप्टरने पुण्याला परतले होते. यानंतर सुनील तटकरे हे हेलिकॉप्टर पुण्यातच सोडून मुंबईला रवाना झाले.
यानंतर आज सकाळी हे हेलिकॉप्टर सुनील तटकरे यांना नेण्यासाठी पुण्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र त्यापूर्वीच या हेलिकॉप्टरला अपघात झाला. सुनील तटकरे हे याच हेलिकॉप्टरने रायगड जिल्ह्यातील सुतारवाडी येथे जाणार होते.
त्यासाठी या हेलिकॉप्टरने ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन उड्डाण केले होते. मात्र, त्यानंतर काहीवेळातच हेलिकॉप्टर बावधन बुद्रुक परिसरातील दरीत कोसळले. या दुर्घटनेत दोन पायलट आणि एका इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे.