---Advertisement---

एकतेचा महाकुंभ नव्या युगाची पहाट!

by team
---Advertisement---

Narendra Modi : २२ जानेवारी २०२४ रोजी, अयोध्येत राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी मी देवभक्ती आणि देशभक्ती म्हणजेच अनुक्रमे दैवी शक्तींची भक्ती आणि राष्ट्राची भक्ती याबाबत विचार मांडले होते. प्रयागराज येथील महाकुंभात देवी आणि देवता, संत, महिला, लहान मुले, तरुण वर्ग, ज्येष्ठ नागरिक आणि जीवनाच्या सर्व स्तरांवरील लोक एकत्र आले. देशामध्ये जागृत झालेल्या जाणिवेचे दर्शन यावेळी घडले. या पवित्र पर्वासाठी सुमारे १४० कोटी भारतीयांच्या भावना एकाच जागी, एकाच वेळी एकवटल्या होत्या, असा हा एकतेचा महाकुंभ होता.

प्रयागराजच्या या पूजनीय प्रदेशात श्रुंगवेरपूर ही एकता, सुसंवाद आणि प्रेमाने भरलेली पवित्र भूमी आहे. श्रीराम आणि निषादराज येथेच परस्परांना भेटले असे म्हणतात. त्यांचीही भेट भक्ती आणि सद्भावनेचे प्रतीक मानले जाते. आजही, प्रयागराज याच भावनेसह आपल्याला प्रेरित करते. या ४५ दिवसांत देशाच्या प्रत्येक कानाकोपर्‍यातून कोट्यवधी लोक संगमावर येत होते. संगमाच्या जागी भावभक्तीच्या लाटा उसळत होत्या. प्रत्येक भाविक येथे एकाच उद्देशाने आला, ते म्हणजे संगमात स्नान करणे. गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा हा पवित्र संगम प्रत्येक यात्रेकरूचे मन उत्सुकता, ऊर्जा आणि विश्वासाने भरून टाकत होता. प्रयागराजमधील महाकुंभ म्हणजे, आधुनिक व्यवस्थापन क्षेत्रातील व्यावसायिक, नियोजन आणि धोरण क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्यासाठी एक अभ्यासाचा विषय ठरला आहे. जगात या भव्यतेशी समांतर असेल किंवा त्याचे उदाहरण ठरेल, असे आयोजन कुठेही झालेले नाही. प्रयागराज येथे नद्यांच्या संगमाच्या ठिकाणी, किनार्‍यांवर कशा प्रकारे कोट्यवधी लोक गोळा झाले, ते संपूर्ण जगाने आश्चर्यचकित होऊन पाहिले. या लोकांना कोणतेही औपचारिक निमंत्रण देण्यात आले नव्हते आणि कधी-कुठे जायचे आहे, यासंदर्भात त्यांच्यात आधी कोणताही संवाद झालेला नव्हता. तरीही, कोटीच्या कोटी लोक स्वतःच्या मर्जीने महाकुंभाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघाले आणि त्यांनी पवित्र जलात स्नान करण्याचे भाग्य अनुभवले. या पवित्र स्नानानंतर अतीव आनंद आणि समाधानाने चमकणारे त्यांचे चेहरे मी विसरू शकत नाही. महिला, वयोवृद्ध, आपले दिव्यांग बंधू-भगिनी अशा सर्वांनी संगमावर पोहोचण्याचा मार्ग शोधून काढला.

या सोहळ्यात भारतातील तरुणांचा प्रचंड प्रमाणातील सहभाग बघणे माझ्यासाठी विशेष हृदयस्पर्शी होते. महाकुंभासारख्या पर्वात तरुण पिढीचा सहभाग असा गहन संदेश देतो की, भारतीय युवक आपल्या वैभवशाली संस्कृती आणि वारशाचे मशालवाहक असतील. ही संस्कृती आणि वारसा जपण्याची त्यांची जबाबदारी त्यांना माहीत असून, ती पुढे नेण्याप्रति ते कटिबद्ध आहेत. महाकुंभात उपस्थित राहण्यासाठी प्रयागराजला आलेल्या लोकांच्या संख्येने निःसंशयपणे नवे विक्रम रचले आहेत. मात्र, प्रत्यक्ष तेथे हजर असलेल्या लोकांबरोबरच जे प्रयागराजला पोहोचू शकले नाहीत, असे कोट्यवधी लोकदेखील मनाने या सोहळ्याशी घट्टपणे बांधले गेले होते. तेथे गेलेल्या भाविकांनी आणलेले पवित्र जल, लाखो लोकांसाठी आध्यात्मिक आशीर्वादाचा स्रोत ठरले. महाकुंभाला उपस्थित राहून परतलेल्या अनेकांचे त्यांच्या गावांमध्ये आदराने स्वागत झाले, समाजाने त्यांचा गौरव केला.
गेल्या काही आठवड्यांत जे घडले, ते अभूतपूर्व असून, त्याने येणार्‍या काही शतकांसाठी पाया रचला आहे. प्रयागराजमध्ये कल्पनेपेक्षा अधिक भाविक दाखल झाले. कुंभमेळ्यातील मागील अनुभवांच्या आधारावर प्रशासनाने भाविकांच्या उपस्थितीचा अंदाज बांधला होता. या एकतेच्या महाकुंभात अमेरिकेच्या लोकसंख्येच्या जवळजवळ दुप्पट संख्येने भाविक सहभागी झाले. अध्यात्माच्या अभ्यासकांनी कोट्यवधी भारतीयांच्या या उत्साही सहभागाचे विश्लेषण केले, तर त्यांना असे दिसून येईल की, आपल्या वारशाचा अभिमान बाळगणारा भारत आता एका नव्या ऊर्जेने पुढे जात आहे. मला विश्वास आहे की, ही एका नवीन युगाची पहाट आहे, जी नव्या भारताचे भविष्य लिहिणार आहे.

हजारो वर्षांपासून या महाकुंभाने भारताची राष्ट्रीय जाणीव बळकट केली आहे. प्रत्येक पूर्णकुंभात संत, अभ्यासक आणि विचारवंत आपापल्या काळातील समाजाच्या स्थितीवर चर्चा करण्यासाठी एकत्र येत होते. त्याचे प्रतिबिंब देशाला आणि समाजाला नवी दिशा देत होते. दर सहा वर्षांनी अर्धकुंभादरम्यान या कल्पनांचा आढावा घेतला जात असे. १४४ वर्षांच्या १२ पूर्णकुंभ सोहळ्यानंतर, कालबाह्य परंपरांचा त्याग करण्यात आला. नवीन कल्पना आत्मसात करण्यात आल्या आणि काळाबरोबर पुढे जात नव्या परंपरा निर्माण करण्यात आल्या. १४४ वर्षांनंतर यंदाच्या महाकुंभात आपल्या संतांनी पुन्हा एकदा भारताच्या विकासयात्रेसाठी नवा संदेश दिला आहे. तो संदेश म्हणजे, ‘विकसित भारत.’ या एकतेच्या महाकुंभात प्रत्येक भाविक, मग तो श्रीमंत असो वा गरीब, तरुण असो वा वृद्ध, खेड्यापाड्यातील असो वा शहरातील, भारतातील असो, अथवा परदेशी, पूर्वेकडील असो की, पश्चिमेकडील, उत्तरेकडील असो की, दक्षिणेकडील, जात, पात, विचारधारा यांचा विचार न करता या ठिकाणी सर्वजण एकत्र आले. कोट्यवधी लोकांमध्ये आत्मविश्वास जागवणार्‍या ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेचे हे मूर्त रूप होते. ‘विकसित भारता’च्या उद्दिष्ट पूर्तीसाठी आता आपण याच भावनेने एकत्र यायला हवे. श्रीकृष्णाने बालपणी यशोदा मातेला आपल्या मुखात संपूर्ण विश्वाचे दर्शन घडवले होते, तो प्रसंग मला आठवतो. त्याचप्रमाणे या महाकुंभात भारताच्या सामूहिक सामर्थ्याची प्रचंड क्षमता भारतीयांनी आणि जगभरातील लोकांनी पाहिली. आपण आता याच आत्मविश्वासाने पुढे जायला हवे आणि ‘विकसित भारता’च्या उभारणीसाठी स्वत:ला समर्पित करायला हवे.

यापूर्वी भक्ती चळवळीतील संतांनी भारतभरातील आपल्या सामूहिक संकल्पाची ताकद ओळखून त्याला प्रोत्साहन दिले होते. स्वामी विवेकानंदांपासून ते अरविंदांपर्यंत प्रत्येक थोर विचारवंतांनी आपल्याला सामूहिक संकल्पांच्या शक्तीची जाणीव करून दिली. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधींनीही याचा अनुभव घेतला होता. स्वातंत्र्योत्तर काळात जर या सामूहिक शक्तीची ताकद ओळखली गेली असती आणि त्याचा उपयोग सर्वांच्या कल्याणासाठी झाला असता, तर नुकतेच स्वातंत्र्य प्राप्त केलेल्या आपल्या देशासाठी ती एक मोठी ताकद ठरली असती. दुर्दैवाने, हे यापूर्वी केले गेले नाही. ‘विकसित भारता’साठी लोकांचीही सामूहिक शक्ती ज्याप्रकारे एकत्र येत आहे, ते पाहून मला आनंद वाटत आहे.वेदांपासून ते विवेकानंदांपर्यंत, प्राचीन धर्मग्रंथांपासून ते आधुनिक उपग्रहांपर्यंत, भारताच्या महान परंपरेने हा देश घडवला आहे. एक नागरिक म्हणून मी प्रार्थना करतो की, आपण आपल्या पूर्वजांच्या आणि संतांच्या आठवणींमधून नवी प्रेरणा घ्यावी. हा एकतेचा महाकुंभ आपल्याला नवे संकल्प घेऊन पुढे जाण्यासाठी साहाय्य करेल. आपण एकतेला आपले मार्गदर्शक तत्त्व बनवूया. ‘राष्ट्रसेवा हीच ईश्वरसेवा आहे,’ या विचाराने आपण काम करूया. काशी इथे निवडणूक प्रचार करत असताना मी म्हटले होते की, माता गंगेने मला बोलावणे धाडले आहे. हे केवळ एक भावनात्मक विधान नव्हते, तर तो आपल्या पवित्र नद्यांच्या स्वच्छतेच्या जबाबदारीप्रति प्रतिसाद होता. प्रयागराजमध्ये जिथे गंगा, यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तिथे उपस्थित असताना तर माझा हा संकल्प अधिकच दृढ झाला. आपल्या नद्यांची स्वच्छता आपल्या स्वतःच्या जगण्याशी खूपच खोलवर जोडली गेलेली आहे. मोठ्या असोत किंवा लहान, आपल्या नद्यांना जीवनदायिनीप्रमाणे जपणे हीच आपली जबाबदारी आहे. या महाकुंभने आपल्याला आपल्या नद्यांच्या स्वच्छतेसाठी सातत्याने काम करत राहण्याची प्रेरणा दिली आहे. मला जाणीव आहे की, एवढ्या भव्य सोहळ्याचे आयोजन करणे, हे काही सोपे काम नव्हते. मी माता गंगा, माता यमुना आणि माता सरस्वतीला प्रार्थना करतो की, आमच्या भक्तीत कोणतीही त्रुटी राहिली असेल, तर त्यांनी आम्हाला क्षमा करावी. मी जनता जनार्दनाला, लोकांना देवत्वाचे प्रतीक मानतो. त्यांची सेवा करण्याच्या प्रयत्नांमध्येदेखील जर कोणतीही उणीव राहिली असेल, तर जनतेनेही क्षमा करावी, अशी मी प्रार्थना करतो.

कोट्यवधी लोक भक्तिभावाने या महाकुंभसाठी आले होते. त्यांची सेवा करणेही एक जबाबदारी होती आणि तीही आम्ही त्याच भक्तिभावनेने पार पाडली. उत्तर प्रदेशाचे प्रतिनिधित्व करणारा संसदेतील सदस्य म्हणून मला अभिमानाने सांगावेसे वाटते की, योगीजींच्या नेतृत्वाखाली इथल्या प्रशासनाने आणि जनतेने एकत्र येऊन हा एकतेचा महाकुंभ यशस्वी केला. राज्य सरकार असो वा केंद्र सरकार, इथे कुणीही शासक किंवा प्रशासक नव्हते, तर प्रत्येक जण म्हणजे समर्पण भावनेने काम करणारे सेवकच होते. स्वच्छता कर्मचारी, पोलीस, नावाडी, वाहनचालक, अन्नदानाची सेवा देणारे लोक अशा प्रत्येकाने अथक परिश्रम घेतले. प्रयागराजच्या जनतेने त्यांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत असतानाही, ज्या उत्साहाने अंतःकरणापासून यात्रेकरूंचे स्वागत केले, ते तर विशेषत्वाने प्रेरणा देणारेच होते. याबद्दल मी त्यांचे आणि उत्तर प्रदेशातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो.

माझा आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यावर कायमच अढळ विश्वास राहिला आहे. या महाकुंभातून मिळालेल्या अनुभवाने तर हा विश्वास आता अनेक पटींनी वाढला आहे. १४० कोटी भारतीयांनी या एकतेच्या महाकुंभला ज्या रितीने जागतिक स्तरावरील एका भव्य सोहळ्याचे स्वरूप मिळवून दिले, ते खरोखरच अद्भुत आहे. आपल्या लोकांच्या समर्पण भावनेने, त्यांच्यातील भक्तिभावाने आणि प्रयत्नांनी प्रेरित होऊन, मी लवकरच १२ ज्योतिर्लिंगांपैकी पहिले ज्योतिर्लिंग असलेल्या श्री सोमनाथ येथे भेट देणार आहे, तिथे मी या सामूहिक राष्ट्रीय प्रयत्नांचे फलित त्यांना अर्पण करणार आहे आणि प्रत्येक भारतीयासाठी प्रार्थनाही करणार आहे. एक आयोजन म्हणून महाकुंभच्या या सोहळ्याचा महाशिवरात्रीला यशस्वी समारोप झाला असला, तरीदेखील ज्याप्रमाणे, गंगेचा प्रवाह जसा अनंत आहे, त्याचप्रमाणे या महाकुंभने जागृत केलेली आध्यात्मिक शक्ती, राष्ट्रीय जाणिवा आणि ऐक्याची भावना भावी पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहणार आहे.

प्रयागराजच्या पवित्र भूमीवर महाकुंभ यशस्वीरित्या संपन्न झाला आहे. जेव्हा देशाची जाणीव जागृत होते, जेव्हा ती अधीनतेच्या शतकानुशतके जुन्या मानसिकतेच्या जोखडातून मोकळी होते, तेव्हा ती नव्या ऊर्जेने भरलेल्या ताज्या हवेत मोकळा श्वास घेते. याचाच परिणाम प्रयागराज येथे दि. १३ जानेवारी रोजीपासून सुरू झालेल्या ‘एकता का महाकुंभ’ म्हणजेच एकतेच्या महाकुंभमध्ये पाहायला मिळाला.

नरेंद्र मोदी, पंतप्रधान

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment