पारोळ्यात ‘भवानी गड’चे पुनर्निर्माण देवी पद्मावतीचे दाक्षिणात्य शैलीतील मंदिरही ठरणार अनोखे

तरुण भारत लाईव्ह न्यूज । विशाल महाजन। पारोळा, ऐतिहासिक वारसा लाभलेले पारोळा शहर सध्या कात टाकत असून, झपाट भवानी चौकातील ‘भवानी गड’ हे देवस्थान अतिशय देखण्या व सुंदर रूपात विकसित झाले आहे. भविष्यात उत्तर महाराष्ट्रातील हे देवस्थान लक्षावधी भाविकांचे आकर्षणाचे धार्मिक पर्यटन स्थळ होऊ पाहत आहे. विद्युत दिवे आणि रोषणाईने झगझगणार्‍या देवस्थानात भाविकांचा वाढता ओघ आहे.

या देवस्थानातील देवी पद्मावतीचे मंदिर दाक्षिणात्य शैलीचे मंदिरही उत्तर महाराष्ट्रातील एकमेव ठरावे. डोंगरावरील हे मंदिर सुमारे 350 वर्षांपूर्वीचे असावे. आतील भवानी माता मूर्ती स्वयंभू आहे. तत्कालिन लहानशा पारोळा या गावी या डोंगर परिसरात गुराखी वावरत असताना त्यांना ही मूर्ती दृष्टीस पडली. त्यातील काहींनी तत्कालिन पेशवेकालीन जहागीरदार नेवाळकरांना ही वार्ता दिली. 1854च्या सुमारास नेवाळकर जहागीरदारांनी परिसराची पाहणी केली. पुढे त्यांनी आंतरिक उर्मीने डोंगरावरील लहानशा स्वयंभू मूर्तीला मंदिराचे रूप दिले. यानंतर क्रमाक्रमाने तांबे परिवाराची जवाबदारी पालटत-पालटत सुधाकर तांबे यांच्याकडून डॉ. मंगेश सुधाकर तांबे यांच्याकडे आली. 1861 पासूनची मंगेश तांबे यांची सातवी पिढी आहे. जवाबदारी आल्यानंतर तांबे यांनी छोट्याशा झपाट भवानी मंदिराचे रूपांतरण भव्य दिव्य गडात केले. झपाट भवानी मंदिरावरून ‘भवानी गड’ हे नामकरणही केले.

असे झाले भवानी गडाचे पुनर्निर्माण
एका सायंकाळी गृहस्वामीनी पत्नी मानसी यांच्यासमवेत भवानी गडाच्या फेरफटका मारत असताना या पारंपरिक देवस्थानाची दुरवस्था पाहून संवेदनशील मन द्रवले आणि या देवस्थानासाठी काहीतरी छान करावे, असा मनोमन विचार डॉ. तांबे यांनी केला. पत्नी मानसी यांनी बळ दिले. प्रोत्साहन, प्रेरणाही दिली. पिताश्री सुधाकर तांबे यांचीही प्रेरणा व इच्छा होतीच. मात्र उत्पन्न किरकोळ अन देवस्थानची दुर्दशा भयावह. आपल्या परिवाराची श्रद्धास्थानाची दयनीय स्तिथी बदलविण्याचा त्यांचा मनोमन विचार होताच एका क्षणी भवानी मंदिरात त्यांनी संकल्प केला अन्‌ ते व्यवसायात व्यवहारात पुढे येत गेले. म्हसवे शिवारात खरेदी केल्यानंतर विक्री केलेल्या जमिनीने तांबे यांना मार्ग दाखविला. या कामाईने त्यांना उभारी दिली अन्‌ त्यांनी एक जबरदस्त संकल्प केला. ‘कमाईतील निम्मा भाग या देवस्थानच्या विकास अन सौंदर्यकरणासाठी’ अन्‌ देवी मातेची कृपा नाशिक भिवंडीतील 5 वर्षीय खरेदी विक्री व्यवहारात लक्ष्मी माता प्रसन्न होत गेली. साहजिकच पुनर्निर्माणाचे काम सुरू झाले.

देवस्थानाचा विकास अन्‌ कायापालट
देवस्थानाचे भव्य प्रवेशद्वार दक्षिण दिशामुख तर उत्तरेला तलाव आहे. भविष्यात त्याचे खोलीकरण, सौंदर्यीकरण करण्याचा विचार देवस्थानाकडून सुरू आहे. कदाचित या स्थळी शेगाव देवस्थानप्रमाणे आनंद सागरच्या धर्तीवर देखणे उद्यान होऊ शकते, असेही तितकेच छान आहे. भवानी गडाचे आजचे देखणे लोभस रूप डोळ्यांचे पारणे फेडणारे असले तरी पूर्वी तेथे भग्न अवस्था होती. ओबडधोबड टेकडी होती. तीदेखील अतिक्रमनानी, कचरा घाणीने वेढलेली होती, हे वास्तव कुणीही नाकारू शकणार नाही. देवस्थानात येणार्‍या भाविकांचे स्वागत होते. विशालकाय, देखण्या, लोभस हत्ती मूर्तीकडून होते.ते एवढे विशालकाय आहेत की, एका ट्रकमध्ये एक हत्ती अशाप्रकारे शेगावहून महत्प्रयासाने येथे आणण्यात आले अर्थात अत्याधुनिक, शक्तिशाली क्रेनने उठाठेव करणे भाग पडले. कार्यकुशल अनुभवी मंडळी श्रमिकांची जीवतोड मेहनतही महत्वाची. तांबे सरकार म्हणून पारोळा परिसरात आणि सर्वत्र असलेला आब आणि रुबाब वृद्धिगत होत आहे, असा त्यांचा दावा आहे.