---Advertisement---
जळगाव : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे समोर आले आहे. दिवसभर चाललेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण तापले असताना, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम वेळेआधी महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरु असलेल्या बैठकीत जागावाटपावर तोडगा निघाल्याचे समोर आले असून, थोड्याच वेळात घोषणा होण्याची शक्यता आहे.
जळगाव महापालिकेच्या एकूण ७५ जागांसाठी महायुतीत भाजप, शिंदेसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्यात अंतिम समन्व्य साधण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजप ४६, शिंदेसेना २३, तर राष्ट्रवादी ६ जागांवर निवडणूक लढवणार आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली अनिश्चितता अखेर संपुष्टात आली आहे.
जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र होते. मात्र, वरिष्ठ नेत्यांच्या हस्तक्षेपानंतर आणि सलग बैठक झाल्यानंतर सर्व इत्क्षणि सामंजस्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले. दुसरीकडे, या निर्णयामुळे अनेक निष्ठावंतांना उमेदवारीपासून वंचित राहावे लागणार आहे.
दरम्यान, थोड्याच वेळात महायुतीतील नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. जळगाव महापालिकेच्या निवणुकीत महायुती एकसंघपणे मैदानात उतरणार असल्याचे या घामोडींवरून स्पष्ट झाले आहे.
महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविली जाणार – माजी मंत्री गुलाबराव देवकर
जळगाव महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविली जाणार आहे. महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला ६ जागा आल्या आहेत, अशी माहिती माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिली. त्यामुळे महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.









