---Advertisement---
जळगाव : महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले असतानाच, भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने मतदानापूर्वीच महापालिकामध्ये आपले खाते उघडले आहे. अर्थात भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यानंतर आता शिवसेनेचे उमेदवार तथा चोपड्याचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांचे सुपुत्र डॉ. गौरव सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
प्रभाग क्रमांक 18-अ मधून गौरव चंद्रकांत सोनवणे यांना शिंदेसेनेने उमेदवारी दिली. त्यांच्या विरोधात मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, आजपासून अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशात उद्धवसेनेचे उमेदवार मयूर चंद्रशेखर सोनवणे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने गौरव चंद्रकांत सोनवणे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यामुळे आता भाजप पाठोपाठ शिंदेसेनेने मतदानापूर्वीच महापालिकामध्ये आपले खाते उघडले आहे.
अन् उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध
प्रभाग १२ ‘ब’ ओबीसी महिला या प्रवर्गातून भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याविरोधात वैशाली पाटील आणि भारती चोपडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
यातील वैशाली पाटील यांनी इतर आणखी दोन प्रभागांत अर्ज दाखल केले आणि भारती चोपडे यांनी अर्ज भरताना त्यात त्रुटी ठेवल्या. त्यामुळे भारती चोपडे यांचा अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आला, तर वैशाली पाटील यांनी दाखल केलेल्या इतर दोन प्रभागांपैकी दुसऱ्या प्रभागात आधी अर्ज दाखल केला.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या प्रभागातीमल अर्ज ग्राह्य धरीत १२ ‘ब’मधील अर्ज तांत्रिकदृष्ट्या निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बाद ठरविला.
त्यामुळे प्रभाग १२ ‘ब’मध्ये केवळ भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने त्यांची निवड बिनविरोध निश्चित झाली. या वेळी मोहन बेंडाळे, भाजपचे महानगर-जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, अरविंद देशमुख, दीपमाला काळे, पिंटू काळे यांच्यासह समर्थकांनी जल्लोष केला.









