रस्त्याची दुर्दशा : शिवसेना उबाठागटाने रस्त्याचे श्राद्ध घालून केले अनोखे आंदोलन

जळगाव :  भोकर ते पळसोद,जामोद,आमोदा बु.,गाढोदा रस्त्याची दुर्दशा झाल्याने शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज आगळे वेगळे रस्त्याचे श्राद्ध घालून आंदोलन करण्यात आले.

जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनवणे यांना शेतकऱ्यांना रस्त्याची समस्या सांगितली. रस्त्याची लांबी ११.९३ किलोमीटर असून त्याचा एकूण खर्च ८१८.३२ लाख रुपये इतका आहे. हा रस्ता भोकर-पळसोद-जामोद-आमोदा बु.-गाढोदा असा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला आहे. या रस्त्यामध्ये लाखोंचा भ्रष्टाचार झालेला आहे असा संशय व्यक्त करत या रस्त्याची चौकशी करून कार्यकारी अभियंता प्रधान मंत्री ग्रामसडक योजना तसेच संबधीत अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा.  तसेच पालकमंत्री यांनी जबाबदारी स्वीकारावी व तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी जळगाव ग्रामीणचे शिवसेना उबाठा उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांनी केली आहे. यावर कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना पदाधिकारी भगवान धनगर, भरत पाटील, प्रभाकर कोळी, एकनाथ सैनदाने, समाधान पाटील तसेच शेतकरी बांधव योगराज पाटील, हेमंत पाटील, मच्छीन्द्र पाटील, बाबुराव पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पाटील, संजय पाटील, शिरीष पाटील, विकास पाटील, शिवाजी पाटील, सुनील पाटील, मुकेश बारेला, प्रवीण पाटील,हिरालाल पाटील उपस्थित होते.