जळगाव : चोपडा तालुक्यात एका महिलेनं नदीच्या पुलावरुन उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. २०० फूट उंचीवरुन पडूनही नदीत सुदैवाने ३ ते ४ फूट पाणी खोल असल्याने त्या बचावल्या. महिलेने पुलावरुन उडी मारताच स्थानिक तरुणांनी तिला वाचवले, परंतु, उंचावरुन पडल्याने महिलेच्या पायाला दुखापत झाली आहे. तत्पूर्वी, या महिलेने आपल्या मुलांना तिच्या नातेवाईकांकडे सोडले होते.
तापी नदीच्या पुलावरून सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास चोपडा शहरातील रहिवासी ममता गोपाल पाटील (३२) या विवाहितेने नदीच्या पाण्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दोनशे फूट उंचावरून उडी मारल्याने महिलेचा डावा पाय फॅक्चर झाला आहे. जीवनाला कंटाळून या महिलेने आपली दोन्ही चिमुकले मुले नातेवाइकांकडे वेले येथे सोडून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, तीन-चार फूट पाण्यात उडी मारल्याने त्या बचावल्या. त्यांनी उडी मारल्याचे पाहून नदीपात्रात असलेल्या ग्रामस्थांनी धाव घेऊन महिलेला बाहेर काढले.
तात्काळ रुग्णवाहिकेतून महिलेला चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. त्यावर तात्काळ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रसाद पाटील आणि डॉ. चंद्रहास पाटील यांनी उपचार सुरू केले. या महिलेला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले आहे.