भुसावळ : तालुक्यातील दीपनगर येथून एका रुग्णवाहिकेचा चालक हा रुग्णवाहिकेतून नवीन प्रकल्पासाठी आलेले साहित्य चोरुन नेत असल्याचा प्रकार शनिवारी घडला. दरम्यान, हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या वेळीच लक्षात आल्याने चोरीचा प्रयत्न हणून पडला. हे साहित्य १३ हजार रुपये किमतीचे होते. चालकाला अटक करण्यात आली आहे. शशिकांत भागवत चौधरी (वय ४१, रा.फुलगाव ता. भुसावळ) असे अटकेतील संशयित आरोपीचे नाव आहे.
दीपनगरातील नवीन ६६० मेगावॉट प्रकल्पातून भेल कंपनीच्या मालकीची फायबर टाकी, लोखंडी अँगल, नटबोल्ड तसेच अन्य लोखंडी साहित्य मिळून १२ हजार ९६० रुपयांचे साहित्य संशयीत शशिकांत चौधरी हा रुग्णवाहिका (क्रमांक एम.एच.१५ जी.व्ही.६७१६) या वाहनातून नेत होता.
शनिवारी दुपारी १ वाजता एम. एस. एफ. सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रवीण खैरे, रोहिदास महाजन, विनोद पवार, प्रवीण पाटील यांच्या हा प्रकार लक्षात आला. यानंतर त्यांनी रुग्णवाहिकेची तपासणी करून खातरजमा केली. त्यांनी याचोरीबाबत भुसावळ तालुका पोलिसांना सूचित केले. यानुसार १२ हजार ९६० रुपयांचे साहित्य व लाखो रुपयांची रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त करीत चालकाला अटक केली.
भुसावळ तालुका पोलिसात एम.एस.एफचे जवान प्रवीण पाटील यांच्या फिर्यादीवरून शशिकांत भागवत चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पोलीस उपनिरीक्षक मंगेश दराडे करीत आहे.