---Advertisement---
अमळनेर शहरातील पिंपळे रस्त्यालगतच्या समर्थ नगर परिसरातील श्रीरंग कॉलनीत बंद घर फोडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारात सुमारे सव्वा लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, ही बाब १२ तारखेला सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
प्रकाश सुकलाल विसपुते हे आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या दरवाज्यावरील कडी-कोंडा तोडून त्यांनी आत प्रवेश करत घरातील कपाटे उघडून सामानाची उलथापालथ करत मौल्यवान वस्तूंवर हात साफ करण्यात आला.
चोरीत ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, सुमारे १०० ग्रॅम चांदीचा गणपती आणि अंदाजे १ लाख २५ हजार रुपयांची रोकड असा एकूण सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी पळवला.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस उपनिरीक्षक शरद काककांडे यांच्यासह कर्मचारी मिलिंद सोनार आणि गणेश पाटील यांनी पंचनामा केला.
सध्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, घर बंद ठेवताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.









