---Advertisement---
देशाच्या राजधानीत खळबळ उडवणारी मोठी बातमी समोर आली आहे. संसद भवनासह दिल्लीतील 9 शाळांना बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली असून, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे अलर्ट मोडवर गेल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी संबंधित धमकीचा मेल प्राप्त झाला. या मेलमध्ये 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजून 11 मिनिटांनी संसद भवनात मोठा स्फोट होईल, असा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. तसेच दिल्लीतील काही शाळांमध्येही बॉम्बस्फोट घडवून आणण्याची भाषा या मेलमध्ये वापरण्यात आली आहे.
या मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरुचा उल्लेख करत दिल्लीला खलिस्तान बनवण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ या नावाने मेल पाठवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. धमकी मिळाल्यानंतर तात्काळ संबंधित शाळांची नावे समोर आली असून, त्या शाळांमध्ये आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
दिल्ली फायर सर्व्हिसकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी विविध शाळांकडून आपत्कालीन कॉल आले. त्यानंतर बॉम्ब शोधक पथक आणि डॉग स्क्वॉडसह तज्ज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले. आतापर्यंत 9 शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी मिळाल्याची माहिती देण्यात आली असून, सर्व ठिकाणी कसून तपास सुरू आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सायबर सेलच्या मदतीने धमकीचा मेल कुठून पाठवण्यात आला, याचा शोध घेतला जात आहे. राजधानीतील संसद, शाळा तसेच इतर संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.
बॉम्बस्फोटाच्या धमकीनंतर दिल्लीतील पोलीस, अग्निशमन दल आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.









