महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा ईमेल गोरेगाव पोलिसांना प्राप्त झाला आहे. या ईमेलमध्ये त्यांच्या वाहनावर बॉम्ब हल्ला करण्याचा इशारा देण्यात आला आहे. याआधीही मंत्रालय आणि जेजे रुग्णालयाला अशा स्वरूपाचे धमकीचे ईमेल आले होते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई सुरू केली असून, संशयिताचा शोध घेतला जात आहे.
गोरेगाव पोलिसांना मिळालेल्या ईमेलमध्ये उपमुख्यमंत्र्यांवर हल्ल्याचा कट रचल्याचा उल्लेख आहे. “लवकरच त्यांच्या गाडीवर बॉम्ब टाकला जाईल,” असे या ईमेलमध्ये लिहिले आहे. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे.
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
सायबर क्राइम युनिट आणि गुन्हे शाखेच्या मदतीने ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. ईमेलचा स्त्रोत शोधण्यासाठी तांत्रिक विश्लेषण केले जात आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबासह, निवासस्थान आणि मंत्रालयाच्या सुरक्षेचीही पुन्हा एकदा तपासणी केली जात आहे.
पूर्वी मिळालेल्या धमक्या आणि सुरक्षा व्यवस्था
हा पहिला प्रसंग नाही की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अशा स्वरूपाच्या धमक्या मिळाल्या आहेत. ऑक्टोबर 2022: मंत्रालयातील त्यांच्या कार्यालयात धमकीचे पत्र प्राप्त झाले होते, त्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला. काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीने मद्याच्या नशेत पोलिसांना फोन करून एकनाथ शिंदे यांना मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणात पोलिसांनी त्वरित कारवाई करत संबंधित आरोपीला अटक केली होती.
नागरिकांनी सतर्क राहावे – पोलिसांचे आवाहन
या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे, मात्र पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा माहिती आढळल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.