Cyber Crime News: धुळ्यातील सायबर पोलिसांनी १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना गुजरातमध्ये पकडले

धुळे: एमएसईबीचे सीईओ असल्याचे भासवत १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या तीन जणांना गुजरातमधून पकडण्यात धुळ्याच्या सायबर पोलिसांना यश मिळाले आहे. सायबर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

धुळे येथील जय श्रीकृष्णा इंटरप्रायजेस इलेक्ट्रिकल फर्मचे मालक जिजाबराव आनंदराव पाटील यांना विज वितरण कंपनीचे धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ महाराष्ट्र विज वितरण कंपीनीचे एमडी लोकेश चंद्रा यांचे काहीतरी महत्वाचे काम आहे. त्यांचा फोन घेणे असा कॉल आला.  यानंतर पाटील यांना एक अनोळखी नंबरवरुन कॉल आला. यात फोन करणाऱ्याने आपले नाव लोकेश चंद्रा, एमएसईडीसीएलचे डायरेक्टर असल्याचे सांगितले.

त्याने सांगितले की, त्याच्या कुटुंबातील सदस्यांवर सर्जरी करावी लागणार असल्याने तात्काळ ८ लाख रुपये पाठवण्याची विनंती केली.  पाटील यांनी यावर विश्वास ठेवत नेट बँकिंगद्वारे पैसे पाठवले. त्यानंतर आणखी ५ लाख रुपये मागण्यात आले, ज्यावर पाटील यांनी आरटीजीएसद्वारे पैसे पाठवले.

यानंतर फिर्यादी यांनी सायंकाळी आरोपीच्या दिलेल्या फोन नंबरवर कॉल केला असता, त्यांनी कॉल रिसिव्ह केला नाही. त्यानंतर कार्यकारी अभियंता जोशी यांच्याकडुन चंद्रा यांचा नबर घेवून संपर्क केला असता चंद्रा यांनी कोणतेही पैशाची मागणी केली असल्याचे नाकारले. यानंतर पाटील यांना आपली सायबर फसवणूक झाली असल्याचे लक्षात आले. यावरुन सायबर पोलीस ठाणे येथे अज्ञात व्यक्तीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तपास अधिकारी पोलीस निरीक्षक घुसर यांच्या सायबर पथकाने गुन्हयाचे अनुषंगाने 4 महिने अथक प्रयत्न करुन सुरत येथुन या गुन्हयाशी संबंधीत तीन आरोपी यशवंत काशिनाथ पाटील, जयशंकर गोपाल गोसाई विजय शिवहरी शिरसाठ यांना ताब्यात घेवून अटक केली.