---Advertisement---
सडावण (ता. अमळनेर) येथील शेतकऱ्याला आपल्या शेतात बांबू लागवड करावयाचे असल्याने योजनेचा लाभ घेण्यासाठी फाईल मंजूर करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारणारे पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज बबनराव कापुरे (वय ५४) यांना रंगेहात पकडण्यात आले. यासोबतच याच कार्यालयातील लिपीक नीलेश मोतीलाल चांदणे (वय ४५) व कंत्राटी कर्मचारी कैलास भरत पाटील (वय २७) यांनाही पकडण्यात आले.
तक्रारदार हे शेतकरी असून त्यांना त्यांचे सडावण शिवारात तसेच त्यांचे ३ नातेवाईक अशांना शेतामध्ये बांबू लागवड करावयाची आहे. तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांच्या शेताच्या बांधावर व पडीक जमिनीवर अमृत महोत्सवी फळझाड/वृक्ष लागवड व फुलपिक लागवड योजनेचा लाभ मिळण्यासाठी ४ फाईल सामाजिक वनीकरण विभाग, अमळनेर यांचा अतिरिक्त कार्यभार पारोळा सामाजिक वनीकरण विभागाचे कापुरे यांच्याकडे होत्या.
दि.२३ जुलै रोजी सामाजिक वनीकरण विभाग, पारोळा कार्यालयात जावून कापुरे यांना भेटून बांबू लागवड करावयाच्या नमूद व्यक्तींच्या नावे असलेल्या ४ फाईली मंजूर करण्यासाठी प्रत्येक फाईलचे १० हजारांप्रमाणे एकूण ४० हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याबाबत तक्रारदार यांनी ५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जळगाव येथे तक्रार दिली होती.
या तक्रारीप्रमाणे लाचमागणी पडताळणी केली असता यातील वनपरिक्षेत्र अधिकारीमनोज बबनराव कापुरे व वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयातील लिपीक नीलेश मोतीलाल चांदणे यांनी तक्रारदार व त्यांच्या वर नमूद नातेवाईकांच्या बांबू लागवडीसंदर्भात ४ फाईली मंजूर करण्याकरिता तडजोडीअंती ३६ हजार रुपये पंचांसमक्ष लाचेची मागणी केली व सदरची रक्कम ही आरोपी क्र. कैलास भरत पाटील (कंत्राटी कर्मचारी) याच्याकडे देण्याबाबत सांगितले. त्याप्रमाणे कैलास भरत पाटील यांनी पंचांसमक्ष लाच रक्कम स्वीकारली. म्हणून आरोपी क्र. १, २ व ३ यांना रंगेहात पकडण्यात आले आहे.
याबाबत तिघांविरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनानुसार पर्यवेक्षण अधिकारी तथा पोलीस उपअधीक्षक, योगेश ठाकूर, तपास अधिकारी पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्या पथकाने पारोळा सामाजिक वनक्षेत्र कार्यालयात केली.