आनंद सोहळ्याला रक्ताचे डाग…!

---Advertisement---

 

धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथील लग्नानिमित्तच्या हळद समारंभात झालेल्या किरकोळ वादातून तीन जणांची निर्घण हत्या हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे. ही घटना केवळ धक्कादायक नाही, तर आपल्या सामाजिक संस्कारांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. विवाह सोहळ्याकडे एक पवित्र प्रसंग म्हणून आपल्या हिंदू संस्कृतीत पाहीले जाते. हा सोहळा दोन कुटुंबांच्या मिलनाचा, प्रेमाचा आणि मंगलमय सोहळा मानला जातो. मात्र अलिकडच्या काळात या आनंदमयी विधींना आक्रमकता, दिखावा आणि बेफिकीरीची लागण होतांना दिसत आहे.

संस्कृती परंपरांना फाटा देत केवळ आपली श्रीमंती दाखविण्याचा प्रकारही काही ठिकाणी दिसून येतो. पूर्वी लग्न म्हणजे साधेपणा, परंपरा आणि आपुलकीचा उत्सव असे. आज दिवसागणिक होणारे ‘इव्हेंट’ परंपरांना फाटा देणारे ठरत आहेत. एकाने हे केले म्हणून दुसरा त्यावर कडी कशी करता येईल याच प्रयत्नात सर्व दिसत असतात. वधू वरांच्या मंगलाष्टकांपासून ते पाहुण्यांच्या आदरातिथ्यापर्यंत सर्वत्र संयम आणि सुसंस्कार दिसत. आज मात्र डीजेचा कर्णकर्कश आवाज, दारूच्या पार्या, बेजबाबदार नाचगाणी, आणि क्षुल्लक कारणावरून उसळणारे वाद, अहंकार भांडणे ही नव्या लग्नसंस्कृतीची विदारक वास्तवता बनली आहे. पिंपळनेरमधील रक्तरंजीत घटना ही याच विकृत प्रवृत्तीचे द्योतक मानावी लागेल. हुंडा ही लग्नसंस्कृतीला लागलेली किड म्हणून मोठ्या प्रमाणावर चर्चेचा विषय ठरली.

आज या वृत्तीला फाटा बसल्याचे काही प्रमाणात लक्षात येते… याची कारणे वेगळी आहेत. लग्नासाठी मुलीच मिळत नाही किंवा तयार होत नाहीत ही ओरड सर्वत्र ऐकायला मिळते. या घटना अचानक घडत नाहीत. त्यामागे निश्चित काही ना काही कारण असतेच. पिंपळनेरच्या या घटनेत विवाहापूर्वीच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या नातलगांमध्ये जुन्या वादातून प्रथम शाब्दीक वाद व नंतर एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंत मजल गेली. क्षणीक राग किती भयंकर ठरू शकतो याचा प्रत्यय येथे आला. शस्त्रे निघाली आणि सपासप वार झाले…एक.. दोन नव्हे तीन जणांची या ठिकाणी हत्या झाली… ज्या मंडपात वधु-वरांच्या डोक्यावर अक्षदा पडायला पाहीजे तेथे रक्ताचे शिंतोडे उडाले आणि सारेच हादरले. किती निघूनता… हैवानी वृत्तीचा हा कळसच मानावा लागेल. आमच्या भावना किती बोथट होत चालल्या आहेत याचीच प्रचिती येते.

यात काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले… यात खटला चालेल शिक्षा होईल पण ज्या कुटुंबातील कर्ती व्यक्ती यात बळी पडली त्या कुटुंबाचे काय? असे साधे विचार करायलाही आपण तयार नाही. आला राग काढले हत्यार आणि घेतला जीव एवढे हे सोपे झाले आहे. समाजातील वाढत्या असहिष्णुतेचे हे
लक्षण आहे. लग्नात मान न दिल्यावरून, बसण्याच्या जागेवरून, डीजेवर लावण्याच्या गाण्यावरून, जेवणाच्या रांगेवरून लग्नसोहळ्यात वाद झाल्याचे आपण नेहमी ऐकतो. क्षणिक राग, मद्यधुंद अवस्था आणि उन्माद यामुळे छोटा वाद क्षणार्धात हिंसाचाराचे रूप घेतो. परिणामी आयुष्यभर लक्षात रहावा असा सोहळा कायमचा काळाकुट्ट होतो. ही परिस्थिती केवळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तो सामाजिक अधःपतनाचा इशारा आहे.

परंपरांना जुने म्हणून हेटाळणी केली जाते. पण त्या मागील संयम, शिस्त आणि मर्यादा आपण विसरत चाललो आहे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण बेफान वागणूक स्वीकारतो आहोत. याचे परिणाम आनंदाचे काही क्षण शोकांतिकेत बदलायला वेळ लागणार नाही, पिंपळनेरच्या घटनेने हेच दाखवून दिले आहे. यावर उपाय काय ? सर्वप्रथम कुटुंबांनीच सजग व्हावे लागेल. लग्न समारंभात मद्यमाप, धिंगाणा आणि अतिरेकीपणाला स्पष्ट नकार दिला पाहीजे. आयोजकांनी सुरक्षेची जबाबदारी गांभीर्याने घ्यावी.

स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनीही संवेदनशील कार्यक्रमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे समाज मनात संयम, सहिष्णुता आणि परस्परांप्रती आदराचे संस्कार रूजविणे गरजेचे आहे. विवाह वा त्याच्याशी संबंधीत कार्यक्रम हे वैर निर्माण करण्याचा नव्हे तर नातेसंबंध दृढ करण्याचा उत्सव आहे. पिंपळनेर सारख्या खटना जर आपल्याला जागे करू शकल्या नाहीत तर उद्या प्रत्येक आनंद सोहळ्यावर अशाच रक्ताचे डाग दिसू लागतील. आता तरी समाजाने याप्रश्नी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---