टाईगर अभी जिंदा है….

तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । एक व्यक्ती तब्बल पाच वर्षे शहरापासून दूर राहते… सर्वच क्षेत्रापासून ती व्यक्ती दूर असते… मधूनमधून त्या शहरातील नागरिक आठवण करतात ती तेवढ्याच कालावधीपर्यंत असते… मात्र पाच वर्षानंतर या व्यक्तीचे शहरात आगमन होते आणि शहरातील नागरिक न भूतो न भविष्यती असे त्या व्यक्तीचे स्वागत करतात… असे दृश्य फार कमी पहायला मिळते. पण जळगावकरांनी याचा अनुभव ‘याची देही याची डोळा’ घेतला… जळगावातच नव्हे तर राज्यात गाजलेल्या घरकुल घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुरेशदादा जैन हे अडचणीत आले… थोडा नव्हे तर तब्बल पाच ते सहा वर्षे त्यांना याप्रकरणी मनस्ताप सहन करावा लागला… यातना भोगाव्या लागल्या… काही काळ वैद्यकीय स्वरूपाचा जामीन मिळाल्यानंतर ते मुंबईत होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी त्यांना न्यायालयाने नियमित जामीन दिल्यानंतर जळगावात एकच चर्चा सुरू झाली… सुरेशदादा परत येताय… आणि तो दिवस उजाडला… गेल्या बुधवारी त्यांचे जळगावात आगमन झाले..सुरेशदादा यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचे स्वागत केले. स्वत: सुरेशदादा जैन यांनी या स्वागताचे वर्णन असे केले की, ३० ते ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत झाले नाही एवढे मोठे स्वागत आज आपण परत आलो असताना जळगावकरांनी केले. स्वागत आटोपले आणि आता एक एक राजकीय नेता सुरेशदादा जैन यांच्या ‘७, शिवाजी नगर’ येथील निवासस्थानी हजेरी लावत आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार सुरेश भोळे, आमदार मंगेश चव्हाण असे एक ना अनेक जण रोज त्यांची भेट घेत आहेत. काहींनी सुरेशदादा यांना पुन्हा राजकारणात येण्याची गळ घातली पण त्यांनी मोठ्या मनाने आता सहकार्‍यांना संधी मिळावी, अशी स्वत:हून भूमिका स्पष्ट केली. अनेकांनी हा आदर्श घेणे गरजेचे यानिमित्ताने वाटते. काहींच्या तीन तर काहींच्या दोन पिढ्या राजकारणात आहेत. काही मंडळींच्या घरातील दोन ते तीन व्यक्ती राजकारणात आहेत… पदांवर आहे तरी अपेक्षा असतातच… त्यासाठी मोठे वाद होतात…आरोपांच्या फैरी उडतात.. असो यालाच राजकारण म्हणतात. सद्य:स्थितीत सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी एकमेकांकडे खुन्नस देऊन बघत असतात.. एकमेकांवर टोकाची टीका करतात. धमक्या दिल्या जातात. याची चर्चा रंगत असताना… ‘७, शिवाजीनगर’वर वेगळेच चित्र दिसते आहे. शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप सर्वच पक्षाचे पदाधिकारी येथे जाऊन आलेत. त्यामुळेच चर्चा सुरू झालीय की… ‘टायगर अभी जिंदा है..’ शिवसेनेच्या तर दोन्ही गटांनी वृत्तपत्रांमध्ये लाखो रूपये खर्च करून जाहिराती दिल्या… सुरेशदादांनी स्पष्ट केलंय की आपण राजकारणात सक्रिय होण्यापेक्षा आशीर्वाद किंवा मार्गदर्शकाच्या भूमिकेला पसंती देऊ… मात्र बरेच जण हे ऐकायला तयार नाहीत. यावर दादांनी आपल्या राजकीय वारसदाराचे नावही जाहीर केले… जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांना सुरेशदादांची पसंती आहे. यामुळे अन्य राजकीय वारसांचा हिरमोड झाला हे नक्की… पण आपल्या मनात नेमके काय… कोण चांगले काम करू शकेल हे विनासंकोच… बेधडक स्वभावानुसार दादांनी हे जाहीर केले. अशोकभाऊ काहीही निर्णय जाहीर करोत, पण दादांनी मोकळ्या मनाने त्यांच्या गळ्यात माळ टाकली आहे. जळगावकरांचे प्रेम पाहून सुरेशदादांना पहिल्या दिवशी गहिवरून आले होते… असे त्यांचे बंधू रमेशदादांनी त्यावेळी सांगितले…आणि त्यात बरेच तथ्यही होते… आता एक मात्र नक्की जळगावकरांचे प्रेम बघता सुरेशदादांवरील जबाबदारीही वाढली आहे. जळगावातील परिस्थितीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे… आता मनपातील पदाधिकारी… अधिकारी वर्ग यांच्यात समन्वय घालून जळगावकरांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांच्या माध्यमातून प्रयत्न व्हायला हवेत… हा सुवर्णमध्य साधला गेल्यास पुन्हा ‘सुंदर जळगाव स्वच्छ जळगाव’चा नारा शहरच नव्हे तर राज्यात पुन्हा घुमू लागेल..