मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी

#image_title

नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील पियुष पाटील आणि वृंदा पाटील या दाम्पत्याचा समावेश आहे.

शहापूर येथील पुलावर कंटेनर, ट्रक आणि श्री गणेश राम ट्रॅव्हल्स खासगी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामुळे जागीच तीन जणांचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर गंभीर जखमींना ठाणे येथे हलविण्यात आले आहे.

मृत दाम्पत्याची ओळख

पियुष पाटील हे बीएमसी मुंबईमध्ये नोकरीस होते, तर वृंदा पाटील या जिल्हा परिषद शाळा बोरगाव येथे युवा प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत होत्या. दरम्यान, त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

दरम्यान, अपघात होताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्तांना मदत केली. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून महामार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे.

हेही वाचा : शिक्षकाशी फेसबुकवर मैत्री; तरुणीने घरी बोलावलं अन् अंगावरील कपडे…, अखेर त्या प्रकरणाचा उलगडा

मकर संक्रांतीच्या दिवशी कुरंगीतील एकाचा  मृत्यू  

तर दुसऱ्या घटनेत, पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील रहिवासी विनोद धनराज पाटील (५२) यांच्यावर मकर संक्रांतीच्या दिवशी काळाने क्रूर झडप घातल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

हेही वाचा : दारू पाजून विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार; नेता आणि गायकावर गंभीर आरोप

विनोद पाटील हे २५ वर्षांपासून कल्याण येथील गजानन माध्यमिक विद्यालयात शिपाई म्हणून कार्यरत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीस अद्याप पाच वर्षे शिल्लक होती. १३ जानेवारी रोजी त्यांनी मकर संक्रांतीनिमित्त पत्नी आणि मुलासोबत सुरत येथील सासऱ्यांना भेटण्यासाठी रेल्वेने प्रवास केला.

१४ जानेवारी रोजी सकाळी दीड वाजता सासऱ्यांच्या घरी पोहोचल्यानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या. त्यांचे मेहुणे यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचारांनंतर मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. डॉक्टरांनी त्वरित ऑपरेशनचा सल्ला दिला. मात्र, ऑपरेशनची तयारी सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

विनोद पाटील यांच्या जाण्याने कुरंगी गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. ते अशोक जैन यांच्या गाडीचे चालक दिनकर पाटील आणि कुरंगी गावाचे माजी उपसरपंच गुलाब पाटील यांचे चुलत बंधू होते. १५ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कुरंगी येथे त्यांच्यावर शोकमग्न वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.