जळगाव : कर्जबाजारीला कंटाळून ५५ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तालुक्यातील धानवड येथे आज मंगळवारी सकाळी ५ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाजी चिंधा पाटील (५५, रा. धानवड ता.जि. जळगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी शेतकऱ्याने सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात “कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले असल्याचे सांगण्यात आले.
नातेवाईकांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील धानवड येथे शिवाजी चिंधा पाटील आपले पत्नी, दोन मुलं आणि नातवंडे यांच्यासह वास्तव्याला आहेत. मंगळवार १९ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्यांनी राहत्या घराच्या मागच्या खोलीत दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती, त्यात म्हटले आहे की, “कर्जबाजारीला कंटाळून मी आत्महत्या करत आहे” असे नमूद केले होते. शिवाय ते गेल्या काही दिवसांपासून ते विवंचनेत होते. त्यामुळे त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला. त्यांचा मुलगा गोपाळ आणि पत्नी यांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले.
नातेवाईकांनी त्यांना खाली उतरून त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.