तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव : शहरात अपघातांची मालिका सुरू असून शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दुचाकीवरून जाणार्या युवकाच्या दुचाकीला भरधाव जाणार्या आयशरने धडक दिली. यात युवक जखमी होऊन पडलेल्या अवस्थेत असतानाच समोरून येणार्या ट्रॅक्टरचे पुढील चाक डोक्यावरून गेल्याने या युवकाचा जागीच मृृत्यू झाला.
शहरातील अपघातग्रस्त किंवा ब्लॅक स्पॉट असलेले खोटेनगरजवळ परिसरातच शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास रावेर तालुक्यातील गहूखेडा येथील युवकाचा आयशरच्या धडकेत आणि ट्रॅक्टरचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेल्या त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे.
सूत्रांनुसार, गहूखेडा येथील प्रशांत तायडे हा युवक त्याचा मित्र जयेश पाटील याच्यासोबत बांभोरी गावाकडे दुचाकी (एमएमच २३५५) ने जात होते. त्याचवेळी तेथून जाणार्या आयशर ट्रक (एमएच १९ वाय ८१६५)ने प्रशांत तायडे याच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत दोघे मित्र रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. त्याचवेळी समोरून खडी भरुन येत असलेल्या ट्रॅक्टर (क्र. एमएच१९ एएन २४३८) चे चाक प्रशांत तायडे याच्या डोक्यावरून गेल्याने प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर असलेला जयेश पाटील हा युवक जबर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी अपघातस्थळी दाखल झाले. प्रशांत तायडे याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला, तर जखमी जयेश पाटील यास तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकिय महाविद्यालय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शहरात राष्ट्रीय महामार्गावर खोटनगरजवळचा ब्लॅक स्पॉट कुप्रसिद्ध आहे. या परिसरात नेहमीच अपघात होत असून, तेथेच नव्हे तर महामार्गावर आवश्यक असलेल्या ठिकाणी मार्गदर्शक सूचना फलक वा अन्य उपाययोजनांची अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
शहर परिसरातच नव्हे तर ग्रामीण तसेच अन्य ठिकाणी योग्य त्या वेग मर्यादेत वाहन
जिल्ह्यात तसेच शहरात सुरू असलेल्या अपघातांच्या संदर्भात ‘अपघातांची मालिका सुरू असताना एकही ब्लॅक स्पॉट नाही’ अशा आशयाचे वृत्त दै. ‘तरुण भारत’ने ३ जानेवारीच्या अंकात प्रसिद्ध केले होते. जिल्ह्यात तीन ठिकाणी ब्लॅकस्पॉट होते. ते तीनही ब्लॅकस्पॉट काढण्यात आले असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी सांगितले होते. ब्लॅक स्पॉटसह जिल्ह्यात अपघातांच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासनासह (वाहतूक) आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत चर्चादेखील करण्यात आले असल्याचे सांगितले होते.