---Advertisement---
भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून भुसावळ रेल्वे मंडळाने एक महत्त्वपूर्ण सूचना जारी केली असून, रेल्वेने प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे स्फोटक, ज्वलनशील किंवा धोकादायक पदार्थ सोबत नेऊ नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वे अधिनियम १९८९ च्या कलम १६४ नुसार, अशा प्रकारचे पदार्थ घेऊन प्रवास करणे हा दंडनीय गुन्हा असून, दोषी संबंधित प्रवाशास ३ वर्षांपर्यंत कारावास, दंड अथवा दोन्ही शिक्षेचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय, निष्काळजीपणामुळे अपघात घडल्यास कठोर शिक्षात्मक कारवाईही करण्यात येणार आहे.
प्रवाशांमध्ये जनजागृतीसाठी भुसावळ मंडळाने विविध प्रचारम आढळल्यास माध्यमांचा वापर करून मोहिमा राबवल्या असून, स्टेशन परिसरात पोस्टर लावणे, उद्घोषणा करणे व तपासणी मोहीम राबवणे यावर भर दिला जात आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, फटाके, केरोसिन यांसारखे ज्वलनशील पदार्थ सोबत नेऊ नयेत.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे सुरक्षा दल, राज्य रेल्वे पोलीस आणि व्यावसायिक निरीक्षण पथकांकडून स्टेशन परिसर व गाड्यांमध्ये सतत नजर ठेवण्यात येत आहे. तसेच प्रवाशांच्या सामानाची नियमित तपासणी केली जात आहे. कोणताही प्रवासी संशयास्पद किंवा धोकादायक वस्तू घेऊन प्रवास करत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रवाशांनी तत्काळ रेल्वे कर्मचाऱ्यांना माहिती द्यावी किंवा रेल्वेचा हेल्पलाईन क्रमांक १३९ वर संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. “प्रवाशांचे सहकार्य हेच रेल्वे सुरक्षेचे बळ आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सुरक्षित आणि सुखद प्रवास करावा,” असे आवाहन भुसावळ रेल्वे मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.