---Advertisement---
जळगाव : मुलाच्या वाढदिवसासाठी केक व पेढे घ्यायला जात असताना वडिलांच्या अंगावर रस्त्याच्या बाजूचे झाड कोसळल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (८ नोव्हेंबर) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास प्रताप नगर परिसरात घडली. भिका देशमुख (५२, रा. रामानंद नगर) असे जखमीचे नाव असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजेश देशमुख हे धुळे येथे आदिवासी विकास प्रकल्प विभागात लेखापरीक्षक म्हणून नोकरीला आहेत. रस्त्याचे बाजूचे झाड अचानक कोसळल्याने या परिसरातील व्यावसायिक योगेश रवींद्र सावळे यांची दुचाकी (क्र. एमएच १९, ईई ७६७२) झाडाखाली दबली जाऊन नुकसान झाले. भररस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्गाने जावे लागले.
देशमुख हे मुलाचा वाढदिवस असल्याने त्यासाठी ते शनिवारी संध्याकाळी केक घेण्यासाठी दुचाकीने जात होते. त्यावेळी अभिनव शाळेनजीक रस्त्याच्या कडेला असलेले एक झाड अचानक कोसळले व ते देशमुख यांच्या डोक्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









