Crime News: गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक, २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

जळगाव :  जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत गांजा विक्री प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४ किलो ५०० ग्रॅम गांजा, दोन मोटारसायकली, दोन मोबाईल आणि इतर मुद्देमाल जप्त करत २.३१ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई चोपडा-शिरपूर रोडवरील अकुलखेडा गावाजवळ करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, शिरपूर येथून एक व्यक्ती मोटारसायकलवर गांजा विक्रीसाठी अकुलखेडा गावाजवळ जात आहे. या माहितीच्या आधारे  स्था निक गुन्हे शाखेच्या आणि चोपडा शहर पोलिसांनी सापळा रचला आणि विजय देवराम मोरे (वय २८, रा. भोरखेडा, ता. शिरपूर, जि. धुळे) आणि अविनाश भिका पाटील (वय २६, रा. वाघळुद, ता. धरणगाव, जि. जळगाव) यांना अटक केली.

दोघांकडून ४ किलो ५०० ग्रॅम गांजा (किंमत ३६ हजाररुपये), दोन मोटारसायकली, दोन मोबाईल आणि इतर मुद्देमाल असा एकूण २ लाख ३१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, पोउनि गणेश वाघमारे, पोउनि अनिल जाधव, पोह विलेश सोनवणे, दिपक माळी आणि रविंद्र यांचा देखील सहभाग होता.

 

गांजा विक्रीच्या या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.