Cyber Crime News जळगाव : सायबर गुन्हेगारांचे पेव फुटले आहे. विविध माध्यमानातून सायबर गुन्हेगार आर्थिक फसवणूक करत आहेत. सायबर ठग हे नवं नवीन क्लुप्तीचा वापर करून सर्वसामान्यांची फसवणूक करत आहेत. हे सायबर ठग व्हाट्सअॅप संदेश, फोन कॉल्स, सोशल मीडिया प्रोफाइल्स, बनावट ईमेल्स आणि ऑनलाइन फसवणूकीचे अनेक प्रकार उघड होत आहेत. सायबर ठगांनी केलेल्या फसवणुकीस जळगाव जिल्ह्यातील नागरिक देखील बळी पडत असल्याचे समोर येत आहे.
जळगाव जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात यावल येथील वृद्ध दाम्पत्यास सायबर ठगांनी व्हाट्सअप कॉलद्वारे धमकावत १ लाख ३० हजारांची फसवणूक केली आहे. तसेच जळगाव शहरात देखील एका महिलेची सायबर ठगांनी २५ लाखांची फसवणूक केल्याची घटना उघड झाली होती. याच प्रकारे जळगाव शहरात एका बेरोजगार तरुणाची ९ लाखांत ऑनलाईन फसवणुक करण्यात आली असून याप्रकरणी सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरात पुन्हा नवीन वर्षांत सायबर ठगांच्या फसवणुकीला एक सुशिक्षित बेरोजगार तरुण बळी पडला आहे. सायबर ठगांनी या तरुणाला नोकरीचे आमिष दाखवत तब्बल 9 लाख 86 हजार रुपयांत ऑनलाईन फसविले आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनी भागातील 26 वर्षीय बेरोजगार तरूण नोकरीच्या शोधात होता. 1 डिसेंबर 2024 रोजी, भाषा मुखर्जीने या संशयिताने मेल आणि मोबाईलवरून तरुणाशी संपर्क साधून त्याला नोकरी देण्याचे आश्वासन देत त्याचा विश्वास संपादन केला. नोकरी लावून देण्याचे सांगून, त्या व्यक्तीने वेळोवेळी तरूणाकडून तब्बल 9 लाख 86 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.
आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर, तरूणाने थेट जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, 1 जानेवारी 2025 रोजी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात भाषा मुखर्जीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सतीष गोराडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.