पारोळा, दि. १७ फेब्रुवारी – पारोळा तालुक्यातील नगाव गावात अंत्ययात्रेदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. स्मशानभूमीकडे जात असलेल्या अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला चढवल्याने मोठी धावपळ उडाली. अचानक झालेल्या या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर पारोळा येथील कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कशामुळे उडाली ही धावपळ?
नगाव गावातील स्मशानभूमीकडे अंत्ययात्रा जात असताना रस्त्यात अचानक मधमाशांचे पोळे हलले. मधमाशांचा थवा संतप्त होताच त्यांनी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांवर हल्ला चढवला. अचानक मधमाशांचे डंख बसू लागल्याने उपस्थित नागरिक घाबरले आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी जीवाच्या आकांताने इधर-उधर पळू लागले. हल्ला इतका भीषण होता की शोकाकुल नातेवाईक मृतदेह रस्त्यातच सोडून पळत सुटले.
तिघे गंभीर जखमी
या घटनेत साधू भागा भिल (वय ७५), ओंकार शंकर भिल (वय ६५) आणि मधुकर सजन भिल (वय ५५) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तसेच अनेक नागरिक किरकोळ जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
या धक्कादायक घटनेनंतर मृतदेह पुन्हा उचलून अंत्यसंस्कार पार पाडण्यात आले. मात्र, मधमाशांच्या अचानक हल्ल्याने गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे आणि अशा घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या अनपेक्षित घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. स्मशानभूमीजवळच मधमाशांचे मोठे पोळे असल्याने भविष्यात पुन्हा अशी घटना घडू नये म्हणून ते हटवण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.