दुर्दैवी! दुचाकीवरून रोडवर पडली महिला अन् ट्रकने चिरडले, जळगावातील घटना

जळगाव : घरी परत असताना दोन दुचाकींच्या अपघातात महिला रोडवर पडली. यावेळी मागून भरधाव येणार्‍या ट्रकने महिलेला चिरडल्याची दुर्देवी घटना मंगळवारी सायंकाळी जळगावात घडली. जुबेदा बेग अलताब हुसेन मिर्झा (वय 48, रा. समता नगर) असे मयत महिलेचे नाव असून दुचाकीस्वार मुलगा गंभीर जखमी झाला आहे.

शहरातील समता नगरात जुबेदा बेग अलताब हुसेन मिर्झा पती व दोन मुलांसह वास्तव्याला होत्या. मंगळवारी सकाळी जुबेदा बेग ह्या सावदा ता. रावेर येथे नातेवाईकांकडे साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी मुलगा कमिन बेग अल्ताफ बेग याच्या सोबत दुचाकीने गेल्या होत्या. सायंकाळी जुबेदा बेग या मुलासह दुचाकीने जळगावकडे येण्यासाठी निघाले.

सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास गोदावरील हॉस्पिटलच्या पुढे नशिराबाद रोडवर समोरून येणार्‍या दुचाकीने धडक दिली. या अपघातात जुबेदा बेग ह्या रोडवर पडल्या, तितक्यात मागून भरधाव वेगाने येणार्‍या ट्रकच्या चाकाखाली येवून चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. महिला ट्रकखाली चिरडल्या गेल्याने ट्रकचालकाने घटनास्थळाहून पोबारा केला. मयत महिलेच्या पश्चात पती, दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.