परभणी : बहिणीला भेटून गावाकडे परतत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये बापलेकीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आहे. बन्सी माणिक चौखट वय ३२ वर्षे आणि भाग्यश्री बन्सी चौखट असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या बाप लेकीचे नाव आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, मानवत तालुक्यातील सारंगपूर येथील बन्सी माणिक चौखट हे त्यांची मुलगी भाग्यश्री हिला घेवून बहिणीकडे गेले होते. बहिणीला भेटल्यानंतर ते एम.एच. २२- बी.एन.६६२९ क्रमांकाच्या दुचाकीने गावाकडे परत निघाले. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास महामार्ग क्रमांक ६१ वर पोहे टाकळीपासून ३ किमी. अंतरावर रेणापूर शिवारात अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात बाप-लेकीचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर अज्ञात वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे.
पोलीस उपनिरीक्षक कार्तिकेश्वर तूरनर यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. अपघातामध्ये मयत झालेल्या बाप-लेकीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. बाप-लेकीच्या अपघातामध्ये मृत्यू झाल्यामुळे चौखट कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर या घटनेमुळे सारंगपूर गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.