पहिल्याच पोस्टिंगसाठी निघाले अन् काळाचा घाला, आयपीएस अधिकाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

आपले ट्रेनिंगपूर्ण करुन पोस्टिंगसाठी जाणाऱ्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा रस्ता अपघातात दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. कर्नाटक क्रेडरचे २०२३ मधील आयपीएस अधिकारी हर्षवर्धन यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. यानंतर सरकारी वाहनाने पोस्टिंगच्या ठिकाणी जात असताना हा अपघात झाला. अचानक टायर फुटल्याने चालकाने नियंत्रण गमविले. ही गाडी थेट एक घरासह झाडावर जाऊन आदळली. या अपघातात आयपीएस हर्षवर्धन यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर हर्षवर्धन यांना कर्नाटकमधील होलेनरसीपूर येथे परिवीक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षकपदी पोस्टिंग देण्यात आली. या पोस्टिंगच्या गावापासून अवघे १० किलोमीटर लांब असताना किट्टाने या गावाजवळ रविवारी संध्याकाळी अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या गाडीचा चालक मंजेगौडा याला किरकोळ दुखापत झाली आहे.

म्हैसूर येथील कर्नाटक पोलीस अकादमीत आयपीएस हर्षवर्धन यांनी यांनी चार आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. ते मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातील दोसर गावाचे रहिवाशी आहे. यांचे कुटुंब बिहारमधील आहे. परंतु, आई-वडील मध्य प्रदेशात राहत होते. त्यांचे वडील अखिलेश हे सबडिव्हीजनल मजिस्ट्रेट आहे.

अपघाताची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, जिल्हा सशस्त्र दलात राखीव असलेल्या वाहनाने हर्षवर्धन जात होते. त्यावेळी त्यांच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे गाडी कलंडली. स्थानिक लोकांनी रेस्क्यू करत त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर ग्रीन कॉरिडोर करत बंगळूरु येथे घेऊन जाण्याची व्यवस्था केली. पंरतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

पहिल्याच प्रयत्नात युपीएससी क्रॅक
हर्षवर्धन यांनी इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली होती. २०२२-२३ च्या कर्नाटक कॅडर बॅचचे ते आयपीएस अधिकारी होते. त्यांनी UPSC परीक्षेत १५३ वा क्रमांक प्राप्त केला होता. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली होती.