दुर्दैवी! मोबाईलने तरुणीला आयुष्यातून उठवलं

नाशिक : जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मोबाईलला हेडफोन लावून गाणे ऐकत जाणाऱ्या तरुणीला ट्रेनने  धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. प्रियंका नामदेव कोकणे वय 17 असे तरुणीचे नाव आहे. इगतपुरी तालुक्यातील जानोरी गावाजवळ ही घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका नामदेव कोकणे ही तरुणी इगतपुरी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. प्रियंका दररोज घरापासून काही अंतर हे पायी चालत असल्याने हेडफोनवर गाणे ऐकत जाण्याची दररोज तिला सवय होती. जानोरी रेल्वे फाटकाजवळून चालत असताना प्रियंकाच्या कानात हेडफोन तसेच होते, गाण्यांचा आवाज मोठा असल्याने तिला ट्रेनचा आवाज आलाच नाही. आणि ट्रेनची धडक बसल्याने प्रियंकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

इगतपुरी महाविद्यालयातील या तरुणीचा असा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाविद्यालय परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना काळजीपूर्वक घरी जाण्याचा सल्ला शिक्षकांकडून दिला जात आहे.