शहादा : तीन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या तरुणाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर त्याच्यासोबत असलेला दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे. प्रदीप कुमार उर्फ राहुल प्रल्हाद पटेल असे मयत तरुणाचे नाव आहे. दि. ३१ डिसेंबर रोजी रात्री डोंगरगाव चौफुलीजवळ हा अपघात झाला.
पोलीस सूत्रांनुसार, शहरातील शंकर विहार सोसायटी वास्तव्यास छोटूलाल पटेल (रा. पाडळदा, ता. शहादा, ह. मु. अमेरिका) यांच्या मुलाच्या विवाहासाठी प्रदीपकुमार उर्फ राहुल प्रल्हादभाई पटेल (२८, रा. निझर, गुजरात) व प्रशांत पुरुषोत्तम पटेल (३०, रा. दहिंदुले, ता. नंदुरबार) हे दोघे युवक डोंगरगाव रस्त्याकडून शंकर विहारकडे दुचाकीने (एमएच ३९ सी ०२६०) जात असताना लोणखेडाकडून दोंडाईचाकडे भरधाव जाणाऱ्या ट्रकच्या चालकाचा (एमपी ०६ एच १६४९) वाहनावरील ताबा सुटल्याने पुढे चालत असलेल्या असलेले दुचाकीला धडक दिली. दोघाही युवकांना जबर मार लागला. घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस निरीक्षक राजेंद्र मोरे व कर्मचारी, शहरातील सामाजिक कार्यकर्ते परेश ताडगे यांनी जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. यानंतर या घटनेची माहिती नातेवाइकांना मिळताच गर्दी केली.
कौठळ येथे झाला होता विवाह….
मयत प्रदीपकुमार पटेल हे कॅनडा येथे नोकरीला होते. अवघ्या तीन दिवसांपूर्वी त्यांचा कौठळ (ता. शहादा) येथे विवाह झाला होता. विवाहानंतर ते पावागढ येथून कालिकादेवीचे दर्शन घेऊन नुकतेच शहरातील मामाच्या मुलाच्या विवाह सोहळ्यासाठी आले असता काळाने त्यांच्यावर घाला घातला. या संपूर्ण घटनेने पटेल परिवारावर शोककळा पसरली आहे.