जळगाव : जिल्ह्यात २८ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: केळी उत्पादक भागातील पिकांना या अनपेक्षित पावसाने मोठे नुकसान केले. शिरपूरसह यावल आणि रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपीट झाली असून, त्यात रब्बी पिकांसह केळी बागांचेही नुकसान झाले आहे.
यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल, रावेर तालुक्यातील सावद, चिनावल, वाघोड कर्जोद इत्यादी अनेक गावांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. गारपीटीमुळे केळी बागांचे मोठे नुकसान झाले असून, हरभरा, गहू, तूर, पपई या पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रावर बैलगाड्यांमध्ये आणलेला कापूस ओला झाल्याने त्यांना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांची पाहणी करण्यासाठी आमदार अमोल जावळे तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले. त्यांनी शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसादही उपस्थित होते.
शिरपूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान
शिरपूर तालुक्यात २७ डिसेंबर रोजी वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे ३० गावे बाधित झाली असून, १२४१ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे. यावर तातडीने कार्यवाही करत आमदार काशीराम पावरा यांनी पंचनाम्याच्या सूचना दिल्या आहेत.
शिरपूर तालुक्यातील आमोदे येथील शेतकरी मानसिंग राजपूत यांच्या शेतावरही वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. आमदार पावरा यांनी शिरपूर तालुक्यातील संबंधित शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या असून, राज्य शासनाकडे आपत्कालीन मदतीची मागणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.