---Advertisement---
गेल्या काही आठवड्यांपासून इराण आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरु आहे. दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होत असल्याने मध्यपूर्वेत अस्थिरता वाढली आहे. या संघर्षाचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावरही होत असून अनेक देशांनी संयम बाळगून युद्ध थांबवण्याचे आवाहन केले आहे. अशा परिस्थितीत अमेरिकेकडून करण्यात आलेल्या एका हल्ल्याची माहिती समोर आली आहे, ज्यात भारताला फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेने इराणमधील मशहद येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात विमानतळाच्या काही भागांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी तेथे उभे असलेले ‘माहान एअर’ या कंपनीचे एक नागरी विमान पूर्णपणे नष्ट झाल्याचं बोललं जात आहे. हे विमान लवकरच दिल्लीकडे रवाना होणार होते. त्यामध्ये युद्धग्रस्तांसाठी सुमारे 11 टन औषधसामग्री पाठवण्याची तयारी सुरू होती.
इराणी अधिकाऱ्यांच्या मते, भारतीय नागरिकांकडून इराणसाठी गोळा केलेली मदतह त्यात समाविष्ट होती. हे विमान भारतातून मानवीय मदत घेऊन परत येणार होतं. मात्र, हल्ला झाल्यामुळे ही संपूर्ण मोहीम विस्कळीत झाली. इराणने या संपूर्ण घटनेला मानवीय सहाय्यावर झालेला हल्ला असे म्हटलं आहे. आता पर्यायी विमानाद्वारे मदत पोहोचवण्याचा विचार सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, इराणची राजधानी तेहरान येथेही तणाव वाढत असून, इस्रायलने शहरातील लष्करी ठिकाणांवर लक्ष्य करत हल्ल्यांची तीव्रता वाढवल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत आशा व्यक्त केली होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती उलट दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे.
टिप : सदर वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसून तरुण भारत लाईव्ह याची पुष्टी करत नाही..









