---Advertisement---
वॉशिंग्टन : दोन्ही देशांमध्ये अंतिम आणि ठोस करार होत नाही, तोपर्यंत अमेरिकेचे सैन्य इराणच्या सीमांपासून मागे हटणार नाही. करार अयशस्वी झाल्यास इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला जाईल, अशी धमकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले की, अमेरिकेच्या सर्व युद्धनौका, विमाने, लष्करी कर्मचारी आणि अतिरिक्त दारूगोळा इराणच्या आसपास तैनात राहतील. आधीच खिळखिळ्या झालेल्या शत्रूचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व सामग्री सज्ज ठेवली जाईल. जोपर्यंत खऱ्या अर्थाने झालेला करार पूर्णपणे अंमलात येत नाही, तोपर्यंत आमचे सैन्य माघारी फिरणार नाही.
ट्रम्प यांनी इराणला कराराच्या अटींची आठवण करून देताना म्हटले की, हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली राहील आणि इराण कोणत्याही अण्वस्त्रांची निर्मिती करणार नाही, असे आश्वासन देण्यात आले आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास इराणला कधीही न पाहिलेल्या भीषण हल्ल्याचा सामना करावा लागेल.
मध्यपूर्वेत तणाव कायम
अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविराम झाला असला, तरी मध्यपूर्वेतील परिस्थिती अजूनही स्फोटक आहे. अमेरिका-इराण करार झाल्यानंतर काही वेळातच इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर भीषण हवाई हल्ले केले. यामुळे इराण संतप्त झाला असून, त्यांनी कराराच्या अटींच्या उल्लंघनाचा आरोप केला.









