चाळीसगावाच्या शाश्वत विकासाकरिता मंगेश चव्हाण यांना मताधिक्य द्या : अजित चव्हाण

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावाचा विकास केला आहे. मी चाळीसगाव तालुक्यामधल्या जगभरात असलेल्या चाळीसगावकरांना एक विनंती करू इच्छितो की, या निवडणुकीच्या निमित्ताने मतदान करायला आपण नक्की या. आपलं मत अजिबात वाया जाणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केले. ते चाळीसगाव विधानसभा मतदार संघांतील महायुतीचे उमेदवार आ. मंगेश चव्हाण यांच्या प्रचार्थ आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, मला असं वाटतं की तरुण मतदारांनी विशेषतः जे मेट्रो सिटी मध्ये आहेत. परदेशात आहे. त्यांनी आवर्जून मतदानासाठी यावं. भारतीय जनता पक्षाचे महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावात केलेला विकास त्यांनी पहावा आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला विजयी करण्यासाठी मतदान करावे. मंगेश चव्हाण यांच्या विजयाची आम्हाला शाश्वती आहे. पण आम्हाला अधिकाधिक मताधिक्य मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत.

या तालुक्यांमध्ये ज्या राजकीय घडामोडी मागच्या काळामध्ये घडल्या आपण सगळे त्याचे साक्षीदार आहात. त्यामुळे चाळीसगावकरांना निश्चितपणे माहिती आहे की, विकास करणारा नक्की कोण आहे ? फक्त आरोप करणारा कोण आहे ? माजी आमदार, माजी खासदार यांनी दहा वर्षाच्या काळामध्ये त्याच्या स्वतःच विकास केला. मी उच्च शिक्षित आहे असे म्हणणाऱ्यांनी उच्च शिक्षणाला साजेशे काही असं काम त्यांनी केले असं मला वाटत नाही. सध्या ते शाश्वत विकास शाश्वत विकास असे म्हणत आहेत. मला असं वाटतं की, शाश्वत विकासासह जे दिसतोय डोळ्याला तो विकास इतका सुखावह आहे आणि तो आम्ही प्रयत्नपूर्वक केलेला आहे. विरोधकांनी फक्त विकास करु अशा केवळ वल्गना केल्या. प्रत्यक्षात त्यांनी केवळ कत्तलखाने आणले यापलीकडे काही केले नाही. माझ्या शहराला व्यापाराची मोठी परंपरा आहे आणि व्यापारी वर्गासाठी म्हणून चांगले निर्णय या सरकारने घेतले आहे. व्यापारी बंधूंच्या हिताचे निर्णय घेण्याकरीता भारतीय जनता पक्षाचे धोरण आहेत. कोणाला तरी घाबरायचं, भीती दाखवायची यातून आपला फायदा करुन घ्यायचा हे विरोधकांनी आतातरी बंद करायला हवं.

महाविकास आघाडीचे सरकार असतांना जिथे जिथे महायुतीचे आमदार होते तेथे तेथे कामं बंद झाली. मात्र , मंगेश चव्हाण यांनी महायुतीचे सरकार नसतांना देखील चाळीसगावचं एकही काम थांबू दिले नाही. असाच कर्तृत्वान आमदार आम्हाला हवा आहे. मंगेश चव्हाण यांनी केलेल्या विकास कामांची मंगेश पर्व ही पुस्तिका मतदार संघांत घरोघरी दिली जात असल्याचेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.