जळगाव : मंगल कार्यालयात हळदीच्या कार्यक्रमात गावठी कट्टा काढत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. संतप्त लोकांनी तरुणाला चोप देत त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. शिवाजीनगरातील इंद्रप्रस्थनगरातील राजाराम मंगल कार्यालयात रविवार, २२ रोजी लग्नाच्या हळदीच्या कार्यक्रमात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयिताला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या दोन साथीदारांनी पलायन केले. तिघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
हळदीचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मंगल कार्यालयात संशयित दहशत माजवू लागल्याने गोंधळ झाला. संशयिताकडे गावठी कट्टा असल्याचे कळताच अनेक उपस्थित लोकांनी त्याला चोपून काढले. या प्रकाराची माहिती शहर पोलिसांना प्राप्त झाली. पोलिसांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता तरुण गावठी कट्ट्यासह आढळून आला. अतुल बजरंग तांबे (वय ३१, रा. राजगुरुनगर, जि. पुणे) असे संशयिताचे नाव असून त्याला पोलिसांनी शस्त्रासह ताब्यात घेतले. संशयिताला पोलीस घेऊन गेल्यानंतर उपस्थितांमध्ये या प्रकाराच्या चर्चेला उधाण आले.
बॅगमध्ये ठेवला होता कट्टा
मंगल कार्यालयात गावठी कट्टा दाखवित तरुण दहशत माजवित आहे, अशी गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी तत्काळ पथक मार्गस्थ केले. पथकाने संबंधित ठिकाणी बारकाईने शोध मोहीम राबवित संशयितापर्यंत तपासाचे चक्र धडकले. अतुल तांबे असे या संशयिताचे नाव आहे. त्याने बॅगमधून गावठी बनावटीचे पिस्तूल पथकाला काढून दिले. मायासह अन्य एक असे दोन त्याचे साथीदार गर्दीचा फायदा घेत पसार झाले. या प्रकरणी हवालदार उमेश भांडारकर यांच्या तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात अतुल तांबे, माया आणि एक अनोळखी अशा तिघांविरोधात आर्म ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई साहाय्यक निरीक्षक रामचंद्र शिखरे, साहाय्यक उपनिरीक्षक सुनील पाटील, हवालदार किशोर निकुंभ, प्रफुल्ल धांडे, भास्कर ठाकरे यांनी केली. संशयित या कार्यक्रमात शिरला की, हळदीला त्याला बोलविले होते? त्याचा येथे कोणाशी परिचय आहे? त्याचे साथीदार पसार होण्यामागचा उद्देश काय? या अनुषंगाने तपासावर भर दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार नाईक हे करीत आहेत.