जळगाव जिल्ह्यात जलस्त्रोत कोरडेठाक ; जिल्हावासीयांना पावसाची प्रतीक्षा

जळगाव : जिल्हातील मोठे, माध्यम व लघु प्रकल्पात एकत्रितपणे केवळ 26.76 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात तीन मोठे, 14 मध्यम व 96 लघु प्रकल्प  आहेत. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पाणीसंकट गडद होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दुसरीकडे जूनच्या दुसर्‍या आठवड्यातही जिल्ह्यातील 107 गावांना तहान भागविण्यासाठी 137 टँकरची मदत घेतली जात आहे. यासोबतच 174 गावांत 194 विहिरी अधिग्रहित, पाच गावांत 10 नवीन विंधनविहिरी, चार गावांत सहा कूपनलिका घेण्यात आल्या आहेत.

जिल्ह्याला पाणी टंचाई जाणवू नये याकरिता जलजीवन मिशनअंतर्गत नळ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. जिल्ह्यात मे व जून या दोन महिन्यांत अनेक गावांतील जलस्त्रोत कोरडेठाक पडत आहे. जून महिन्यांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे.

जिल्ह्यात त्या त्या गावातील प्राप्त प्रस्ताव व आवश्यकतेनुसार विहीर, कूपनलिका अधिग्रहण, तसेच टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. 20 जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 292 गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, जूनच्या दुसर्‍या आठवड्यातच टंचाई निवारणार्थ जिल्ह्यातील 107 गावांना तहान भागविण्यासाठी 137 टँकर सुरू आहेत. 174 गावांत 194 विहिरी अधिग्रहित, पाच गावांत 10 नवीन विंधनविहिरी, चार गावांत सहा कूपनलिका घेण्यात आल्या आहेत. तसेच एका गावात विंधनविहीर विशेष दुरुस्ती आणि एका गावात विहीर खोलीकरणाचे काम करण्यात आले आहे. टंचाईची तीव्रता कमी होण्यासाठी जिल्ह्यात एक-दोन दिवसांत दमदार पाऊस अपेक्षित आहे.

20 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील 219 गावे टंचाईच्या गडद छायेत होती. आता 292 गावांना टंचाईच्या  तीव्र झळा पोहोचत आहेत.

तालुकानिहाय टँकरद्वारे तहान भागविलेली गावे

चाळीसगाव :  विसापूर तांडा, अंधारी, करजगाव, कृष्णानगर, हातगाव, हिरापूर, तमगव्हाण, रोहिणी, राजदेहरे, ब्राह्मणशेवगे, घोडेगाव, हातगाव भिल्लवस्ती, पिंप्री बुद्रुक प्र. दे, खराडी, दोणदिगर, तळेगाव, न्हावे, पिंपळगाव, माळशेवगे, शिंदी, चत्रभुज तांडा, शेवरी, बिलाखेड, शिरसगाव, जुनपाणी, पिंपळवाड निकुंभ, तळोंदे प्र. दे., चिंचगव्हाण, अभोणे तांडा, सुंदरनगर, नाईकनगर तांडा क्रमांक 1, वाघळी. भडगाव : तळबंद तांडा, वसंतवाडी, आंचळगाव, मळगाव, वडगाव बुद्रुक, धोत्रे, पासर्डी; अमळनेर : तळवाडे, शिरसाळे बुद्रुक, निसर्डी, लोणपंचम, नगाव खुर्द, देवगाव-देवळी, सबगव्हाण, भरवस, अंचलवाडी, आटाळे, पिंपळे खुर्द, चिमणपुरी, डांगर बुद्रुक, नगाव बुद्रुक, आडी अनोरे, गलवाडे, लोणचारम तांडा, पिंपळे बुद्रुक, चोपडाई, कावपिंप्री, कोंढावळ, फाफोरे बुद्रुक, रणाईचे बुद्रुक व खुर्द, खर्दे व खेडी बुद्रुक प्र. डां., खडके, वाघोदे, इंदापिंप्री, गलवाडे खुर्द, मंगरूळ, धानोरा, जानवे; पारोळा : खेडीढोक, हणुमंतखेडे, कन्हेरे, चहुत्रे-वडगाव प्र. अ., मंगरूळ, भोंडणदिगर, वडगाव प्र. अ., सुमठाणे; भुसावळ : कंडारी, कुर्‍हे प्र. न.; जामनेर : रोटवद, मोरगाव, काळखेडे, एकुलती बुद्रुक व खुर्द, वाडी, ओझर बुद्रुक व खुर्द, हिंगणे न. क., वाकोद, जांभोळ, किन्ही, सोनारी, वाडीकिल्ला; जळगाव : वराड, लोणवाडी बुद्रुक, सुभाषवाडी, शिरसोली, कुसुंबे खुर्द, वावडदा; पाचोरा : खाजोळा, लोहारा, घुसर्डी, निंभोरी बुद्रुक, रामेश्‍वर; बोदवड ः जलचक्र बुद्रुक व खुर्द.